नगर जिल्ह्यातील जागा वाटपात अजितदादांचे विद्यमान आमदारच भाजपसाठी अडचणीचे ठरत आहेत
नगर (सचिन कलमदाणे)
: लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर भाजप विधानसभा निवडणुकीसाठी सावध पावलं टाकत आहे. नगर जिल्ह्यात दक्षिणेची लोकसभेची जागा भाजपला गमवावी लागली होती. त्यामुळे विधानसभेला पुन्हा जिल्ह्यात वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपसमोर आव्हानांची मालिका तयार झाली आहे. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला शिर्डी, शेवगाव-पाथर्डी व श्रीगोंदा या तीनच जागांवर यश मिळालं होतं. एकत्रित राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने 8 जागा जिंकण्याची कामगिरी केली होती. त्यामुळे यंदा भाजपसाठी मोठी कसोटी असून राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार भाजपबरोबर आले असले तरी नगर जिल्ह्यातील जागा वाटपात अजितदादांचे विद्यमान आमदारच भाजपसाठी अडचणीचे ठरत आहेत.
नगर शहर, अकोले, कोपरगाव या तीन मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यामुळे या तीनही जागांवर भाजपला पाणी सोडावे लागणार आहे. कर्जत जामखेड व राहुरी मतदारसंघात शरद पवार गटाचे आमदार असल्याने भाजपला या दोन्ही जागा लढवता येतील. याशिवाय शेवगाव-पाथर्डी, श्रीगोंदा, शिर्डी येथे भाजपचे विद्यमान आमदार असल्याने संबंधित उमेदवार निर्धास्त आहेत. परंतु, अजित पवार गटाने श्रीगोंदा तसेच शेवगाव-पाथर्डी मतदारसंघावर दावा केल्याने याठिकाणी भाजपची डोकेदुखी वाढली आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात अजित पवार गटाचे माजी आ.चंद्रशेखर घुले रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत तर श्रीगोंद्यात अनुराधा नागवडे यांनी दोन वर्षांपासून जोरदार तयारी केली आहे.
बंडखोरीची शक्यता…
कोपरगाव मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असल्याने तूर्तास भाजपमध्ये असलेले विवेक कोल्हे वेगळ्या विचारात आहेत. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेटही घेतली आहे. दुसरीकडे अकोले मतदारसंघातही भाजपमध्ये असलेल्या पिचड पिता पुत्रांनी शरद पवार यांची भेट घेवून तुतारी हाती घेण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे श्रीगोंदा मतदारसंघ भाजपने न सोडल्यास नागवडे सुध्दा ऐनवेळी बंड करू शकतात. नगर शहरात तर भाजपने ठराव करून पक्षाकडे आग्रह धरला आहे. येथेही ऐनवेळी निष्ठावान भाजप नेत्यांकडून वेगळा विचार केला जाऊ शकतो.