Monday, June 23, 2025

चाहुल विधानसभेची…कर्जतमधून इच्छुक आघाडीवर तर जामखेडमध्ये उमेदवारीची फक्त चर्चाच

विधानसभा उमेदवारीसाठी महायुतीत चुरस, कर्जतमधून इच्छुक आघाडीवर तर जामखेडमध्ये उमेदवारीची फक्त चर्चाच

विधानसभेची चाहुल – नासीर पठाण
जामखेड – कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 25 वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपला धक्का देण्यासाठी 2019 च्या निवडणुकीत थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी उमेदवारी केली. सर्व विरोधकांनी एकत्र येऊन रोहीत पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडुन आणले. 25 वर्षानंतर भाजपचा बालेकिल्ला उध्दवस्त झाला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. यानंतर अडीच वर्षे भाजप अदृश्य झाली होती. अडीच वर्षांच्या वनवासानंतर राम शिंदे विधानपरिषदेतून सहा वर्षांकरीता आमदार झाले आणि तालुक्यातील भाजप सक्रीय झाली. आताच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले. आ. रोहीत पवार पुन्हा निवडणूक लढवणार असल्याने जामखेड मधून महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा प्रश्न निकाली निघाली आहे. त्याचवेळी प्रा.राम शिंदे हे विधानपरिषदेचे सदस्य असल्याने कर्जत तालुक्यातून मात्र भाजपकडे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडेही इच्छुकांची संख्या वाढली आहे. जामखेडमध्ये मात्र सध्या महायुतीकडेही उमेदवाराची वानवा असल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना 9 हजार 128 चे मताधिक्य मिळाले आहे. 2019 मध्ये भाजप उमेदवार सुजय विखेंना 24 हजाराचे मताधिक्य होते. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. रोहीत पवार यांना 43 हजाराचे मताधिक्य मिळाले. हेच मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेस टिकवून ठेवू शकले नाही. त्यातच महायुतीचे बलाढ्य व विधानसभा इच्छुक समजल्या जाणाऱ्या नेत्यांच्या गावात भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळाले नाही. काही ठिकाणी तर काठावर आहे.
विद्यमान आ. रोहीत पवार पुन्हा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने त्यामुळे त्यांच्या पक्षातील कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य व 2009 ला विधानसभा निवडणूक लढलेले प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, यांनी आपल्या तलवारी म्यान केल्यासारखी परिस्थिती आहे. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थात रस दाखवला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी जामखेड तालुक्यात पहिला साखर कारखाना काढला तरी त्यांना 2014 च्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर गेले. यामुळे त्यांनी येथून पुढे कोणतीच निवडणूक न लढवणार नाही असे जाहीर करून किंगमेकर होण्याचे ठरवले आहे. त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या काळात निलेश लंके खासदार झाले. त्यामुळे त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा याबाबत आ. रोहीत पवार यांना विचार करावा लागणार आहे.
महाविकास आघाडीतील घटक असलेल्या काँग्रेसचे अँड. कैलास शेवाळे, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके, मिनाक्षी साळुंखे, शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठागट) बळीराम यादव हे सुध्दा आघाडीत बिघाडी झाल्यास संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंबालिका कारखाना कर्जत तालुक्यात आहे. आ. राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील 1200 एकर जागेत एमआयडीसी करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. कुकडीचे पाटपाणी, सिना धरणाचे आवर्तन कर्जत तालुक्यासाठी आहे. या सर्व जमेच्या बाजू असताना महायुतीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर मताधिक्य महाविकास आघाडीला लोकसभेला कर्जत मधून मिळाले आहे. तर जामखेड मधून फक्त तीन अंकी मताधिक्य आहे. त्यामुळे कर्जत तालुका निर्णायक ठरणार आहे.

आ. राम शिंदे हे विधानपरिषदेतून सदस्य झाले आहेत. त्यांचा कार्यकाल 2029 पर्यंत आहे. त्यामुळे ते निवडणूक लढविणार की नाही याबाबत जरी संभ्रम असला तरी मागील दोन वर्षांपासून ते मतदारसंघात सक्रीय झालेले आहे. राज्यातील सत्ताबदलाचा फायदा घेत त्यांनी एमआयडीसीची जागा बदलली, जामखेड पाणीपुरवठा योजनेला गती दिली. कृष्णा भिमा स्थिरीकरणसाठी चालवलेला प्रयत्न त्यामुळे आ. रोहीत पवार यांना मीच फाईट देऊ शकतो असे चित्र निर्माण केले आहे. मात्र काँग्रेस नेते प्रविण घुले यांचा एक दीड वर्षापूर्वी भाजपमध्ये झालेला प्रवेशही विधानसभा निवडणुकीसाठी होता की दुसरी रणनीती होती हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे ऐनवेळचे उमेदवार म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुले, अशोक खेडकर, परमवीर पांडुळे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ हे भाजपमधून इच्छुक आहेत.

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट तर या मतदारसंघावर आमचा हक्क असल्याचे सांगत आहे. 2019 मध्ये ह्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. विनिंग सिटचा दावा केला गेला तर नियमाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क आहे. त्यांच्या पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मनिषा गुंड व त्यांचे पती माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड इच्छुक आहेत. राज्यातील महायुतीच्या जागावाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार या मतदारसंघावर दावा ठोकणार हे निश्चित मात्र आमदार राम शिंदे हे जर विधानसभा लढणार असेल तर ते माघार घेतील अशीच शक्यता अधिक आहे.

लोकसभा निवडणुकीत मताधिक्य पाहता कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 1995 ते 2014 पर्यंत असलेला भाजपचा बालेकिल्ला परत राखण्यासाठी महायुती कामाला लागली आहे. तर दुसरीकडे आ. रोहीत पवार हेच महाविकास आघाडीचे उमेदवार समजून महायुतीने उमेदवारीचा प्रश्न निकालात काढावे लागेल.


प्रा.मधुकर राळेभात यांच्यासाठी मोठी संधी
जामखेडमध्ये मोठे वलय असलेले प्रा.मधुकर राळेभात यांनी या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करून मोठी मते मिळवली होती. सध्या ते आ.रोहित पवार यांच्यासोबत असले तरी प्रा.राम शिंदे यांच्या ऐवजी एक मातब्बर मराठा चेहरा म्हणून भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जावू शकते. तसे झाल्यास पवार विरुध्द राळेभात अशी लढत होईल. याशिवाय प्रा.राळेभात यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही सुरुवातीपासून सलोख्याचे संबंध आहेत. हा मतदारसंघ अजित पवारांनी मिळवल्यास त्यांच्या पक्षाकडूनही प्रा.राळेभात हे सक्षम उमेदवार ठरू शकतील, अशी चर्चा जामखेडमध्ये जोरात सुरु आ
हे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles