नगर(सचिन कलमदाणे): लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शेवगाव पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर घुले पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. भाजपचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचार नियोजनासाठी नगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यास उपस्थित राहून त्यांनी शेवगाव पाथर्डी मतदारसंघात विखेंना मोठा ‘लीड’देण्याचे जाहीर केले त्याचवेळी लीडचे श्रेय आम्हालाच मिळायला हवं असेही त्यांनी जाहीरपणे विखेंना सांगितले.
मागील विधानसभा निवडणुकीत घुले पाटील यांनी एकत्रित राष्ट्रवादीची उमेदवारी न करता ॲड प्रताप ढाकणे यांना संधी दिली होती. तेव्हापासून घुले पाटील मुख्य प्रवाहापासून अंतर राखून होते. मात्र आता ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ते अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. या मतदारसंघात गेली दोन टर्म भाजपच्या मोनिका राजळे यांनी आमदारकी मिळवली आहे. दुसरीकडे ढाकणे यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेऊन निलेश लंके यांच्यासाठी ताकद लावली आहे. अशा परिस्थितीत घुलेंच्या रुपात तिसरी मोठी शक्ती शेवगाव पाथर्डी मतदारसंघात सक्रिय झाल्याने राजळे आणि ढाकणे यांना नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.