Saturday, May 18, 2024

नगर शहरात खा. सुजय विखेंसाठी आमदार संग्राम जगताप ठरणार किंगमेकर!

तरूणाईची मोठी फळी जगताप यांच्या माध्यमातून विखेंसाठी सक्रिय

नगर: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांच्यात थेट लढत रंगणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. नगर दक्षिण मतदारसंघात नगर शहरातील मतदान आणि इथले मताधिक्य निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहरातून मागील पंचवार्षिकला खासदार विखे पाटील यांना जवळपास ५० हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी त्यांना एकत्रित शिवसेनेची साथ मिळाली. मोदी लाटेचाही त्यांना फायदा झाला. यावेळी शिवसेनेचा उबाठा गट भाजपपासून दुरावला आहे. भाजपमधील जुने निष्ठावंतही काही प्रमाणात नाराजच आहेत. अशा वेळी खासदार विखेंसाठी नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हेच मुख्य भूमिका बजावतील अशी शक्यता आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी सलग दोन वेळा नगर शहर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सलग २५ वर्षे आमदार राहिलेल्या माजी मंत्री अनिल राठोड यांना त्यांनी दोन वेळा पराभूत केले. महायुतीमुळे आता त्यांनी आपली ताकद विखेंच्या पाठिशी उभी केली आहे. नगर दक्षिण मतदारसंघात त्यांच्यावर पक्षाने मुख्य समन्वयक म्हणूनही जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे पूर्ण मतदारसंघात अजित पवार गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते विखेंच्या प्रचारात सक्रिय होतील यादृष्टीने त्यांनी मनापासून प्रयत्न चालवले आहेत. मागील पाच वर्षांत त्यांनी विखेंना विकासाच्या मुद्द्यावर साथ दिली. नगर शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल प्रत्यक्ष साकारला गेला. कल्याण रोडवर सीना नदीवरील पूल बांधण्यात येत आहे. याशिवाय शहरातील डीपी रस्ते, अन्य मूलभूत सुविधांसाठी आमदार जगताप यांनी शासनाकडून कोट्यवधींचा निधी खेचून आणला आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीही जगताप यांना सर्व ताकद देत भरीव निधीची तरतूद करण्यात हात सैल सोडले आहेत. खासदार आणि आमदार यांच्यातील समन्वय नगर शहराला विकासाच्या दिशेने नेत आहे. त्यामुळे विखेंची उमेदवारी जाहीर होताच आमदार संग्राम जगताप यांनी शहरात राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेऊन कामाला सुरुवात केली. स्वतः माजी आमदार अरूणकाका जगतापही मेळाव्याला आवर्जून उपस्थित होते. नगर शहरात आमदार जगताप यांनी सर्वच प्रभागात कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली आहे. नगरसेवकांचा मोठा संच त्यांच्याकडे आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि शहरात मोठे वर्चस्व असलेल्या आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे विखेंसाठी नगर शहरात चांगले वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसेनेतील फाटाफूटीमुळे झालेल्या वजाबाकीची आ. जगताप करणार बेरीज

नगर शहरात एकत्रित शिवसेनेची पारंपरिक मतपेढीची दोन गटांमुळे वजाबाकी झाली आहे. त्याचा फटका विखेंना मतदानात बसू शकतो. याच परिस्थितीत आ. जगताप आपल्या ताकदीवर मतांची बेरीज करून विखेंना मताधिक्य मिळवून देऊ शकतात. आ. जगताप यांची रसद विखेंना पुन्हा दिल्लीत पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार अशीच चर्चा शहरात रंगली आहे.

शरद पवार गटाची ताकद घटली

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नगर शहरात शरद पवार गटाची ताकद घटली आहे. बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार जगताप यांना साथ देत अजित पवार गटात दाखल झाले आहेत. अशावेळी माजी आमदार निलेश लंके यांना नगर शहरात मते मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. त्यांच्याच पक्षाची ताकद नाही आणि शिवसेना ठाकरे गटही क्षीण झालेला आहे. अशा परिस्थितीत नगर शहरातून दिल्लीत जाण्याचा लंके यांचा मार्ग सध्या तरी खडतरच असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles