नगर-कल्याण महामार्गावरील नेप्ती चौकातील सीना नदीवर 27 कोटी रुपये खर्चून नवा पूल उभारला जात आहे. त्याचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात खासदार सुजय विखे यांनी युवा सेना पदाधिकारी विक्रम राठोड, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.
भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, प्रा. राम शिंदे यांच्यासह अनेक छोटे- मोठे फराळाचे कार्यक्रम झाले. सुमारे दहा फराळाचे कार्यक्रम या काळात झाले, परंतु शुक्रवारी मी वाढदिवसानिमित्त ‘तिखट’ खायला ठेवले आहे. त्यावेळी दहा फराळाला गेलेले प्रत्येक जण तेथे येणार आहे आणि फराळाने जर माणूस मोठा झाला असता तर प्रत्येक आमदार हा हलवाईच झाला असता, असा उपरोधिक घणाघात त्यांनी केला.
तीस वर्षात नगरकरांनी खूप काही सोसले आहे. आंदोलने, शिवीगाळ, मनपा आयुक्तावर शाई फेक, उपोषणे असे सारे केले. परंतु विकास काही केला नाही. त्यामुळे विकास या एकमेव मुद्द्यावर पक्षीय जोडे बाजूला ठेवून मी व आमदार जगताप एकत्रित करत असलेले काम अनेकांना आवडत नाही, असा दावाही खासदार विखे यांनी केला.