पारनेरमधील नीलेश लंके प्रतिष्ठानने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवपुत्र संभाजी महाराज या महानाट्याचा प्रयोग नगरमध्ये घेतला. या महानाट्यातील अभिनेते खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी ते सादर केले. महानाट्याच्या समारोपादिवशी खासदार कोल्हे यांनी दिल्लीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ‘तुतारी’ नगरमधून लोकनेत्यांनी वाजवावी, असे विधान करत आमदार नीलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात येण्याचे निमंत्रण दिले.
भाजप खासदार विखे यांनी यावर टिप्पणी केली आहे.
खा. विखे म्हणाले, “कोणाला तुतारी वाजवायची, कोणाला बॅण्ड वाजवायचा, कोणाला ढोल वाजवायचा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मला त्याच्यात रस नाही. आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीकडून भाजप जो उमेदवार देईल, त्याचे काम करणार आहोत. हे काम प्रामाणिक आणि चांगले असणार आहे.” तुतारीबाबत अगोदरच बोललो होतो. हवा तर फुंकली जाईल. पण आवाज निघतो का माहीत नाही. येणाऱ्या कालावधीत तुम्हाला कळेल,’ असेहीदेखील खासदार विखे यांनी म्हटले.