Saturday, October 5, 2024

नगर जिल्ह्यात ‘तुतारी’ कि ‘घड्याळ’? बदललेल्या परिस्थितीत दोन्ही पवारांसमोर मोठं आव्हान

नगर जिल्ह्यात ‘तुतारी’ कि ‘घड्याळ’? बदललेल्या परिस्थितीत दोन्ही पवारांसमोर मोठं आव्हान

नगर(सचिन कलमदाणे): राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर होणाऱ्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमनेसामने येणार आहेत. अनेक मतदारसंघात दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांना आव्हान देणार आहेत. यात नगर जिल्ह्यातील दोन पवारांच्या उमेदवारांच्या लढती लक्षणीय ठरणार आहेत. थोरल्या पवारांनी आपला सर्व राजकीय अनुभव पणाला लावून उमेदवारी निश्चिती चालवली आहे तर अजित पवार सुद्धा आपले राजकीय कौशल्य दाखवून लोकसभेतील अपयश धुवून काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नगर जिल्ह्यात मागील विधानसभा निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादीने ६ जागांवर विजय मिळवला होता. आपापल्या आघाडीत चांगली कामगिरी करायची तर दोन्ही पवारांना नगर जिल्ह्यात मोठे यश मिळवावे लागेल.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादीने अकोले, कोपरगाव, कर्जत जामखेड, नगर शहर, राहुरी तसेच पारनेर मतदारसंघात यश मिळवले होते. पक्षात फूट पडल्यानंतर आ. संग्राम जगताप, आ. डॉ. किरण लहामटे, आ. आशुतोष काळे, आमदार निलेश लंके अजित पवार गटात दाखल झाले. आमदार लंके लोकसभा मतदारसंघात पुन्हा शरद पवारांकडे परतले आणि खासदारही झाले. आ.रोहित पवार, आ. प्राजक्त तनपुरे सुरूवातीपासून शरद पवार गटात राहिलेत.

आता हे सर्व विद्यमान आमदार पुन्हा एकदा मैदान मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांना कोण आणि कसे आव्हान देणार याची उत्सुकता वाढली आहे. अजितदादांच्या विद्यमान आमदारांच्या विरोधात शरद गट सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. अकोलेत अमित भांगरे यांच्या रूपाने युवा चेहरा पुढे आणला जात आहे. नगर शहरात माजी महापौर अभिषेक कळमकर, हाजी शौकत तांबोळी, डॉ. आठरे इच्छुक आहेत. श्रीगोंदा मतदारसंघात माजी आमदार राहुल जगताप तयारी करीत असून अण्णासाहेब शेलार यांनीही शरद पवाराची भेट घेतली आहे. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात ॲड प्रताप ढाकणे पूर्ण तयारीत आहेत. कोपरगावमध्ये विवेक कोल्हे सज्ज झालेत. पारनेर मध्ये राणीताई लंके यांनी जनसंपर्क वाढवला आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विद्यमान आमदार निवडून आणतानाच अधिकच्या जागा जिंकण्यासाठी जोर लावला आहे ‌ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या महाराष्ट्र यात्रेची सुरुवात नगरमध्ये करून एक पाऊल पुढे टाकले आहे. श्रीगोंदा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी आग्रही असून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनुराधा नागवडे सज्ज झाल्या आहेत. जिल्ह्यात मागील विधानसभा निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादीचे ४ उमेदवार थेट भाजपचा पराभव करून आमदार झाले होते. यात अकोले येथील डॉ. किरण लहामटे, कोपरगाव येथील आशुतोष काळे, कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार, राहुरीत प्राजक्त तनपुरे विजयी झाले होते. यातील लहामटे व काळे अजित पवार गटात असून स्थानिक भाजपच्या नेत्यांचा त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप आहे. अकोलेत भाजपच्या वैभव पिचड यांनी तर आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा वेळी जागा मिळाल्या तरी स्थानिक पातळीवर भाजपची तितकी साथ मिळेल का हा सुद्धा प्रश्नच आहे.

बदललेल्या राजकारणामुळे दोन्ही गटांसाठी सगळीच समीकरणे बिघडली आहेत. यातुन योग्य मार्ग काढत यशाचा आलेख कायम ठेवण्याचे मोठं आव्हान दोन्ही पवारांसमोर उभं ठाकले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles