जिल्हाध्यक्ष निवडीवरून आरपीआय आठवले गटात घमासान
सुनील साळवे आठवलेंच्या भेटीला
नगर (प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्री रामदास आठवले येत्या 3 फेब्रुवारी रोजी नगर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा अगदी तोंडावर आलेला असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आठवले गटात जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून पक्षांतर्गत घमासान सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
आठवले यांच्या दौऱ्याच्या तयारी निमित्ताने नुकतीच राहुरी इथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत कर्जत तालुक्यातील संजय भैलूमे यांची नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मात्र या निवडीवर दक्षिण जिल्ह्यध्यक्ष पदावर कार्यरत असलेले सुनील साळवे यांनी आक्षेप घेतल्याची माहिती आहे. याबाबत साळवे यांनी थेट राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, निवडणूक निर्णय अधिकारी बी.के. बर्वे यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांच्या तक्रारीनंतर सुनील साळवे यांना मुंबई मध्ये रामदास आठवले यांनी तातडीने बोलावले आहे. विशेष म्हणजे श्रीकांत भालेराव यांनीच 20 ऑगस्ट 2022 रोजी पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी बर्वे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली नगर दक्षिण जिल्ह्याची कार्यकारीणी जाहीर केली होती.
या कार्यकारिणीला राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी मान्यता दिली होती आणि या कार्यकारीणीची मुदत संपलेली नव्हती अशी माहिती खात्रीशीर मिळत आहे. याबाबत सुनील साळवे यांनी रामदास आठवले यांना पत्र पाठवून जिल्ह्यात संपर्कप्रमुख भालेराव यांच्या माध्यमातून मनमानी पद्धतीने कामकाज सुरू असल्याचे आणि त्यामुळे पक्ष संघटना चालवण्यात येत असलेल्या अडचणींचा पाढा वाचला आहे. पत्रात आर्थिक हित पाहून निर्णय होत असल्याचा गंभीर आरोप असल्याने तसेच जिल्हाध्यक्ष पदावरील निर्णय पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचे सांगण्यात आल्याने याबाबत थेट राज्य निवडणूक आयोगाकडे जाण्याची भूमिका सुनील साळवे यांनी दिली असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
आपल्या कामातून ठसा उमटवलेल्या सुनील साळवे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पदाधिकारी आश्चर्यचकित झाले असून, आठवले यांच्या भेटीला हे सर्व पदाधिकारी जाणार असल्याचे समजते आहे. साळवे यांनी पक्षाच्या संपर्कप्रमुख आणि राज्य उपाध्यक्ष वाकचौरे यांच्या घेतलेल्या निर्णयाला आव्हान दिल्याने वरिष्ठ पातळीवरून तातडीने दखल घेतली असल्याने सुनील साळवे यांना बुधवारी तातडीने मुंबईत चर्चेला बोलावण्यात आले आहे.
आठवलेंच्या नगर दौऱ्याआधी जिल्हाध्यक्ष निवडीवरून पक्षात घमासान…सुनिल साळवेंना तातडीने मुंबईला बोलवले
- Advertisement -