‘काँग्रेसचा सन्मान आणि स्वाभिमान जपत इतर समविचारी पक्षासोबत पूर्वी आघाडी केली जात होती. अलीकडे मात्र महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करणारी मंडळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर शरणागत झाल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे. त्यातील काही नेते तर पूर्वीपासूनच शरद पवार यांच्या सल्ल्यानेच काम करतात, असा अनेक वेळा उघड आरोप देखील झालेला आहे. पुढे नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेसची सूत्र हाती घेतल्यानंतर काँग्रेसला एक ऊर्जावान नेतृत्व मिळाल्याचा माझ्यासह सर्वांना आनंद झाला होता. मात्र मागील दोन वर्षात स्थानिक पातळीवरील काँग्रेस अंतर्गत वस्तुस्थितीचा राजकारणाचा आढावा घेता पटोलेही त्याच वाटेने जात असल्याचे जाणवते,’ असे अलीकडेच काँग्रेस सोडून भाजपध्ये प्रवेश केलेले विनायक देशमुख यांनी म्हटले आहे.
देशमुख यांनी म्हटले आहे, १९९० पासून मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. युवक काँग्रेस, जिल्हा काँग्रेस, प्रदेश काँग्रेस ए.आय.सी.सी. अशा विविध स्तरावर मी संघटनेत कार्यरत होतो. या काळात स्व. शिवाजीराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, प्रतापराव भोसले स्व. गोविंदराव आदिक स्व.प्रभाताई राव, माणिकराव ठाकरे, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले या प्रदेशाध्यक्षांच्या समवेत आणि मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. अनेक वेळा काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करावी लागली. मात्र अशा प्रकारची आघाडी करताना त्या त्या वेळच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस पक्षाच्या आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सन्मानाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतलेली होती.