अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीत बुडालेल्या दोन युवकांचे मृतदेह आज सकाळी सापडले. बुधवार पासून याठिकाणी झालेल्या अपघातात एकूण सहा जण बुडून मृत्यू पावले आहेत.बुधवारी प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणाचा शोध घेत असतांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) बोट उलटून सहा जण नदीपात्रात बुडाले. यातील तीन जणांचे मृतदेह गुरूवारी सापडले होते तर दोन जन बचावले होते. बेपत्ता दोघांचे मृतदेह शोध घेण्याचे काम सुरू होते. ठाणे येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने नदी पात्रात लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे मृतदेह आढळून आले.
बुधवारी दुपारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदी पाञात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (वय २५ रा. धुळवड, ता सिन्नर) व अर्जुन रामदास जेडगुले (वय १८ ,रा .पेमगिरी, तालुका संगमनेर) हे दोघे तरुण बुडाले होते. त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला तर अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू होता. पण बुधवारी रात्रीपर्यंत त्याला शोधण्यात यश आले नाही.बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आले होते. त्याप्रमाणे या दलाचे पथक तीन गाड्यां मधुन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सकाळीच शोध कार्यास सुरुवात केली. दोन बोटी मधुन ही शोध मोहीम सुरू करण्यात आली. प्रत्येक बोटीत पाच जवान होते तर एका बोटीत गणेश मधुकर देशमुख (वय -३७, रा.सुगाव बुद्रुक ) या स्थानिक युवकाला घटनेचे निश्चित ठिकाण दर्शविण्या साठी बरोबर घेण्यात आले होते.
सहा जणांना जलसमाधी
प्रकाश नाना शिंदे (पोलीस उपनिरीक्षक)
वैभव सुनील वाघ(चालक)
राहुल गोपीचंद पावरा(कॉन्स्टेबल )
सागर पोपट जेडगुले (रा. धुळवड,ता.सिन्नर)
अर्जुन रामदास जेडगुले(रा. पेमगिरी, त्ता.संगमनेर)
गणेश मधुकर देशमुख (रा.सुगाव बुद्रुक )