Saturday, October 5, 2024

अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक पुन्हा स्वगृही ? रोहकले, डॉ.कळमकर तांबे विरुद्ध एकत्र !

अहमदनगर -शिक्षक बँकेतील पराभवाचे आत्मचिंतन करून रोहोकले गट पुन्हा एकदा शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सज्ज झाला आहे. त्यासाठी रविवारी नगरमध्ये कार्यकर्ता मेळावा घेऊन रोहोकले गटाने शिक्षक परिषदेला सोडचिठ्ठी देऊन थेट संभाजीराव थोरातांच्या मार्गदर्शनातील शिक्षक संघात स्वगृही परतण्याच्या वाटेवर असल्याचे दिसले. त्यामुळे हा निर्णय झाला तर बँकेचे राजकीय समीकरणही बदलणार असून, सत्ताधारी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते रावसाहेब रोहोकले आणि डॉ. संजय कळमकर हे एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे तांबे यांनी नगरमध्ये महाअधिवेशन घेऊन ताकद दाखविली होती, फेब्रुवारीत कळमकर, रोहोकले गटही महाअधिवेशनाच्या तयारीत आहे.
जिल्ह्यात शिक्षकांचे राजकारण सर्वश्रुत आहे. शिक्षक बँकेच्या निवडणुकीत गुरुमाऊलीचे बापूसाहेब तांबे यांनी ऐक्यसह अन्य मंडळांना सोबत घेऊन चौरंगी लढतीत रोहोकले गुरुजी, गुरुकुलचे डॉ. संजय कळमकर आणि सदिच्छाचे राजेंद्र शिंदे यांच्या पॅनलचा पराभव केला. सर्वच पराभूत संघटना ह्या एकमेकांवर पराभवाचे खापर फोडत असताना डॉ.कळमकर यांचे कौशल्य आणि त्यांचे राज्यातील महत्त्व हेरून शिक्षक संघाचे राज्याचे नेते संभाजीराव थोरात यांनी त्यांच्यासाठी पायघड्या टाकल्या. आबासाहेब जगताप यांनी यात महत्त्वाची भुमिका घेतली. कळमकर यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याने नगरमध्ये संघाची ताकद वाढली.
पुढे शिक्षक संघ, जो शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. त्यात शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांना निमंत्रित केले गेले. यात सदिच्छाचे राजेंद्र शिंदे हे ‘चाणक्य’ ठरले. नगरच्या एका कार्यक्रमात तांबे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत हा प्रवेश केला. तांबेंच्या प्रवेशातून पाटील गटाने जणू थोरात गटाला शह दिल्याची चर्चा झाली.
एकीकडे बापूसाहेब तांबे, डॉ. संजय कळमकर हे दोन परस्परविरोधी गटात सहभागी झाले असताना रोहोकले गटदेखील शिक्षक परिषदेत फारसा समाधानी नव्हता. त्यामुळे निवडणुकीनंतरच प्रवीण ठुबे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच शिक्षक परिषदेलाही जिल्ह्यात घरघर लागली होती. प्रभारी अध्यक्ष म्हणून संजय शेळके यांनी जबाबदारी पेलली. मात्र कार्यकर्त्यांची मानसिकता वेगळी होती. आता बापूसाहेब तांबे हे पाटील गटात असल्याने त्या ठिकाणी रोहोकले गट जाणार नव्हताच. त्यामुळे पुन्हा एकदा स्वगृती थोरात गटात जाण्याचा कार्यकर्त्यांचा मूड आहे. रविवारी 7 रोजी मार्केट यार्डात रोहोकले गटाची बैठक पार पडली. यात शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले यांची उपस्थिती होती. त्यात शिक्षक परिषदेला सोडचिठ्ठी देऊन थोरात यांच्या नेतृत्वातील शिक्षक संघात जाण्याचा सूर आला. मात्र रोहोकले गुरुजींनी जनमताचा आदर करेल, या एका शब्दातून संघात परतण्याचे संकेत दिले. त्यामुळे जर हा निर्णय झाला, तर रोहोकले, कळमकर गटामुळे नगरमध्ये थोरात गटाची ताकद वाढणार असून, ती शिवाजीराव पाटील यांच्यासह बापूसाहेब तांबे यांच्यासाठीही डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा आहे.

ज्यांनी हाकलले, त्यांच्याकडे जाणार नाही ः खामकर
आम्ही अगोदर शिक्षक संघातच होतो, मात्र तिथे रोहोकले गुरुजींचा अपमान झाला. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी जर कोणी जात असेल, तर आमचा त्याला विरोध आहे. आम्ही शिक्षक परिषद सोडणार नाही, अशी भूमिका संपर्कप्रमुख संतोष खामकर यांनी ‘पुढारी’कडे मांडली. ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी थोरात गटाने गुरुजींचा अपमान करून आमच्या गटाला हाकलून लावले. त्या वेळी शिक्षक परिषदेनेच आम्हाला आश्रय दिला. मात्र, आता काहीही कारण नसताना परिषद सोडून ज्यांनी अपमान केला, त्यांच्याकडे परत जायचे हे आम्हाला मान्य नाही. माझ्यासमवेत 10 ते 15 पदाधिकारी परिषदेत थांबणार आहोत. खामकर यांच्या या दाव्याने रोहोकले गटात मोठी फूट पडणार असल्याची चर्चा आहे.
आमच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही ः ठुबे
जे कोणी विरोधात भुुमिका घेत असतील ते आमचे पदाधिकारी नाहीत, त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. बैठकीत सर्व लोकं गुरुजींसोबतच राहणार असल्याचे दिसले. या पार्श्वभूमीवरच फेब्रुवारीत जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाअधिवेशन घेणार असल्याचे प्रवीण ठुबे यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles