पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पैसे आले आहेत. तुमचे आधार कार्ड द्या, असा बहाणा करत २ – ३ जणांनी वृद्ध महिलेच्या घरात घुसून कपाटाची उचकापाचक सुरु केली, मात्र त्या महिलेला शंका आल्याने तिने आरडा ओरडा केल्यावर त्या भामट्यांनी तेथून धूम ठोकल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी गावच्या शिवारात असलेल्या वाळकी – देऊळगाव रस्त्यावरील श्रीपत सर्जेराव कासार यांच्या घरी मंगळवारी (दि.१२) दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबतची माहिती अशी की, मंगळवारी (दि.१२) दुपारी श्रीपत कासार हे कामानिमित्त शेतात गेले होते. घरी त्यांची वृद्ध आई एकटीच होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास दोन तीन अनोळखी इसम घरी आले. वृद्ध महिलेशिवाय घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत त्यांनी वृद्ध महिलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुम्हाला पैसे पाठवले असल्याचे सांगत ५०० रुपयांची एक नोट त्यांच्या हातात दिली. त्यानंतर तुमच्या मुलाच्या नावावर पण १० हजार रुपये आले आहेत. त्यांचे आधार कार्ड दया असे सांगितले. या वृद्ध महिलेने त्यांना मोबाईल वर मुलाला फोन करण्यास सांगितले.
त्यांनी फोन करण्याचा बहाणा केला. आणि तुमच्या मुलाचे आधार कार्ड कपाटात आहे असे त्यांनी सांगितले. त्या महिलेने आतल्या खोलीचे दार उघडल्यावर हे भामटेच पुढे झाले व त्यांनी खोलीत घुसून कपाटाची उचकापाचक सुरु केली. त्यामुळे वृद्ध महिलेला शंका आली व त्यांनी आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे हे भामटे तेथून लगेच बाहेर पडले व जाताना त्यांनी महिलेला दिलेली पाचशेची नोट हिसकावून घेऊन तेथून धुम ठोकली. महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजारी पाजारी पळत तेथे आले, मात्र तो पर्यंत भामटे तेथून पसार झाले होते.