विरोधकांच्या खोट्या प्रचाराला रोखण्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बुथ पासून ते सोशल मिडीयावर वैचारीक लढाई करावी लागणार आहे. लोकाभिमुख कामांमुळे महायुती सरकार सत्तेवर येणार असल्याने ‘अपनी सरकार अच्छी सरकार’ हा संदेश घरोघरी योजनांच्या माध्यमातून पोहचवण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकार यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे उत्तर नगर जिल्ह्याचे अधिवेशन राहता येथे संपन्न झाले. जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार वैभव पिचड, सरचिटणीस नितिन दिनकर, नितीन कापसे, महीला जिल्हाध्यक्षा सौ.कांचन माढरे, ओबीसी मोर्चाचे प्रकाश चित्ते, बाळासाहेब गाडेकर,डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, मुकूंदराव सदाफळ, भाजयुमोचे योगेश गोंदकर, किरण बोराडे, अध्यक्ष सचिन शिंदे, श्रीराम गणपुले, जालिंदर वाकचौरे, मारुती बिंगले, अमोल खताळ, रघूनाथ बोठे आदी उपस्थित होते. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिस-यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
आपल्या भाषणात सौ.विजया राहाटकर म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत देशवासियांनी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसविण्यासाठी समर्थन दिले. ही किमया फक्त प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेल्या योजनांची होती. कॉग्रेस सरकारच्या काळात फक्त घोषणा होत्या. मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रधानसेवक म्हणून सेवा केल्याचे राहाटकर यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूकीत वाईट शक्ती एकत्रित आल्या. सरकारच्या विरेाधात खोटा अपप्रचार करुन, दिशाभूल करण्याचे काम जाणीवपुर्वक त्यांनी केले. मात्र संविधानामध्ये बदल करण्याचे आणि सोईनुसार त्याचा वापर करुन, अनेक राज्यांची सरकार बरखास्त करण्याचे काम याच कॉग्रेस पक्षाने केले. याचा सोयीस्कर विसर राहुल गांधी यांना पडला. संविधानाचा सर्वाधिक अपमान कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात झाला. या उलट संविधानाचा सन्मान करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झाला असल्याचे रहाटकर म्हणाल्या.
केंद्र सरकारने अनुसुचित जाती, जमाती, मागासवर्गीय आणि ओबीसींचे हक्क आबादीत ठेवण्याचे काम केले. त्यासाठी मोठे काम केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केलेल्या निर्णयामुळे त्यांनाही सर्व संधी मिळाल्या. परंतू केवळ सरकारच्या विरोधात खोट्या अफवा पसरवून विरोधकांनी अपप्रचार केला असला तरी देशातील जनतेने कुठेही भारतीय जनता पक्षाला नाकारलेले नाही, हे मतांच्या टक्केवारी वरुन दिसून येते याकडे त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.
राज्यातील महायुती सरकारनेही मागील अडीच वर्षात सर्वाधिक लोकहिताचे निर्णय घेतले. आज मराठा आराक्षणावरुन, सरकारला आणि देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचे काम सुरु आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम भारतीय जनता पक्षामुळेच झाले. महाविकास आघाडीने उलट हे आरक्षण घालविले. न्यायालयात बाजु मांडण्यासाठी वकीलही उभे केले नाहीत. महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुलींना मोफत शिक्षण आणि शेतक-यांसाठी सौरपंपाची योजना सुरु केली आहे. या योजनांसाठी बुथस्तरापर्यंत कार्यकर्त्यांना काम करायचे आहे.
कारण एकीकडे योजनांना नावे ठेवून, महाविकास आघाडीचे नेतेच योजनांचा प्रचार करीत असले तरी, योजना बदनाम कशा होतील हाच प्रयत्न त्यांचा असल्याचा आरोप रहाटकर यांनी आपल्या भाषणात दिला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सरचिटणीस नितीन दिनकर, सरचिटणीस नितीन कापसे यांचीही भाषणे झाली. या आधिवेशनास उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पदाधिकारी, युवक आणि महीला कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.