अहमदनगर -राहुरी शहरातील बस स्थानकासमोर नगर-मनमाड राज्य महामार्गावर काल 18 मे रोजी सायंकाळी झालेल्या दुचाकी व कंटेनरच्या अपघातात शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कुंदनमल सुराणा हे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
राहुरी नगरपरिषदचे माजी नगरसेवक तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कुंदनमल माणकचंद सुराणा (वय 73) रा. गोकुळ कॉलनी हे सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान शहरातून नगर-मनमाड रस्त्याने त्यांच्या घराकडे दुचाकीवर जात असताना राहुरी बसस्थानकासमोर अपघात होऊन एका कंटनेरच्या चाकाखाली ते सापडले. कंटेनरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कंटेनर ताब्यात घेऊन मृतदेह रुग्णालयात नेला व वाहतूक सुरळीत केली.
अपघातात ठार झालेल्या कुंदनमल सुराणा यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.