अहमदनगर -राहुरी खुर्द येथे मोटरसायकलवर आलेल्या तिघांकडून एका तरूणावर शनिवारी सकाळी सत्तूर व कोयत्या सारख्या शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत विकी वैष्णव हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विकी सुरेश वैष्णव (वय 27) हा तरूण राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोड परिसरात राहत आहे. विकी वैष्णव याने तालुक्यातील देसवंडी येथील पप्पू कल्हापूरे याच्याकडून काही महिन्यांपूर्वी व्याजाने पैसे घेतले होते. सदर पैशाच्या व्यवहारावरुन दोघांमध्ये वाद सुरु होते. विकी सुरेश वैष्णव हा 30 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजे दरम्यान तालुक्यातील राहुरी खुर्द येथे एका हॉटेल समोर बसलेला होता. त्यावेळी तेथे एका मोटरसायकलवर पप्पू गंगाधर कल्हापूरे व त्याच्या बरोबर इतर दोन तरूण तोंडाला रुमाल बांधून आले. काही कळायच्या आत त्या तिघा जणांनी विकी वैष्णव याच्यावर सत्तूर, कोयता सारख्या शस्त्राने सपासप वार केले.
तब्बल अकरा वार करुन तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विकी वैष्णव याला काही तरुणांनी तात्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैष्णव हा गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले. यावेळी त्याच्यावर वैद्यकीय अधिकारी विशाल अंबरे यांनी उपचार केले असता तब्बल दीडशे टाके पडले आहे.
यावेळी राहुरी येथील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस नाईक रवींद्र कांबळे यांनी ग्रामीण रुग्णालय हजर राहुन विकी वैष्णव याचा जबाब नोंदवून घेतला. त्यानुसार पप्पू गंगाधर कल्हापूरे व इतर अनोळखी दोनजण अशा तिघांवर राहुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार गु.र.न. 1136/2023 भा.दं.वि. कलम 307, आर्म अॅक्ट 4/25, 326,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.