सोनगाव (ता. राहुरी) येथील भाजपच्या पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी तुतारी हाती घेऊन भाजपला रामराम ठोकला. त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिला.
राहुरी येथे (शुक्रवारी) आमदार तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा झाला. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस व सोनगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण अंत्रे, तालुका सरचिटणीस प्रशांत अंत्रे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र अनाप, ओबीसी आघाडीचे तालुका संघटक महेश पर्वत, ओबीसी आघाडी कार्यकारिणी सदस्य संतोष अंत्रे, सामाजिक कार्यकर्ते सूरज शिंदे आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
आमदार तनपुरे म्हणाले, सोनगाव, सात्रळ, धानोरे पंचक्रोशीत विजेची समस्या व रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले. कामे घेऊन आलेले पदाधिकारी कोणत्या पक्षाचे आहेत. याचा विचार न करता जनतेची कामे मार्गी लावण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे सोनगाव येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये सन्मानाची वागणूक मिळेल, असेही तनपुरे यांनी सांगितले.
किरण अंत्रे म्हणाले, सोनगाव येथील भाजपच्या गटातटाच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विरोधक असताना आमदार तनपुरे यांना सांगितलेली विकास कामे त्यांनी मार्गी लावली. त्यांच्या कामावर प्रभावित झाल्याने राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला. आगामी विधानसभेला राष्ट्रवादीला मताधिक्य देण्यास कटिबद्ध आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. यावेळी मिलिंद अनाप, अण्णासाहेब अनाप, सूर्यभान शिंदे, दिग्विजय शिरसाठ, नरेंद्र अनाप, राहुरीचे माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब उंडे, नंदकुमार तनपुरे, प्रकाश भुजाडी उपस्थित होते.