Wednesday, November 29, 2023

…तर त्यांना जिल्हा बँकेवर आरोप करण्याचा नैतिक आधिकार नाही

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याची कामधेनू असून बँकेने नेहमीच जिल्ह्यातील सभासद सहकारी संस्थांना बळकटी दिली असून जिल्ह्यातील साखर कारखानदारीला बँकेने सतत साथ दिल्याने जिल्ह्यातील साखर कारखाने सुस्थितीत आहेत. सहकारी संस्थांना अडचणीत आणणार्‍या प्रवृत्तीच्या लोकांना नावलौकीक असलेल्या जिल्हा बँकेवर चुकीचे आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले व संचालक मंडळाने आ.प्राजक्त तनपुरे यांनी बँकेच्या कारभारावर केलेल्या टीकेला उत्तर देताना लगावला.

याबाबत चेअरमन कर्डिले व संचालक मंडळाने सांगितले की, जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने बँकेचे कर्ज नियमित फेड करीत असून त्यांच्याकडे थकबाकी राहत नसल्याने त्यांच्या कार्यक्षेत्राचा व शेतकर्‍यांचा या कारखान्याने विकासच केलेला आहे. तथापि जिल्हा बँकेच्या कारभारावर टिका करणार्‍यांनी आपल्या तालुक्यातील सत्ता भोगलेल्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना, मुळा शेतकरी सहकारी सूतगिरणी, राहुरी तालुका सहकारी सूतगिरणी अशा अनेक संस्थांना आ.प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खा.प्रसादराव तनपुरे यांनी जिल्हा सहकारी बँकेकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेवून संस्थांचा कारभार व्यवस्थित न करता जिल्हा बँकेची थकबाकी केली आहे.

आजही त्या संस्थांकडे बँकेची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. संस्थेचा कारभार सभासद व शेतकरी हिताकरिता करण्याऐवजी स्वत:च्या विकासासाठी व राजकारणासाठीच केला आहे व करीत आहेत. तनपुरे घराण्यामुळे राहुरी तालुक्यातील अनेक संस्था अडचणीत येवून बंद पडलेल्या आहेत, हे सर्व जनतेला व शेतकर्‍यांना ज्ञात आहेच. या त्यांच्या कारभारामुळे या भागातील सामान्य शेतकर्‍यांबरोबर इतरही ग्रामीण भागातील कामगार व व्यावसायिकांच्या विकासाला खिळ बसलेली आहे. परिणामी तालुका विकासापासून वंचित राहिलेला आहे. जर या संस्था चांगल्या पध्दतीने चालविल्या असत्या तर निश्चितच राहुरी तालुक्याचा आणखी विकास झाला असता. त्यांच्या या कारभारामुळे जिल्हा बँकेच्या थकबाकीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे.

बँकेत नेहमीच पक्षीय व गटातटाचे राजकारण न करता बँकेचे संचालक मंडळ सर्वतोपरी चर्चा करूनच निर्णय घेत असतात. या बँकेत कोणत्याही प्रकारचे मनमानी कारभार करीत नसून प्रत्येक गोष्टींवर संचालक मंडळात चर्चा होवूनच निर्णय होत असल्याने याबाबत कोणीही जनतेची व सभासदाची दिशाभूल करू नये. बँकेचा कारभार पारदर्शी असून बँक नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यात नावलौकीक असलेली जिल्हा बँक म्हणून ओळख आहे. बँकेस सातत्याने ऑडीट वर्ग ‘अ’ राहिलेला आहे.

जिल्हा बँकेने दोन गाड्यांची खरेदी केली असली तरी त्याचा उपयोग हा जिल्ह्यातील शेतकरी हिताकरिता व बँकेचा कारभार पाहण्यासाठीच होत असतो. तनपुरे घराण्याने यापूर्वी कोणकोणत्या गाड्या वापरल्या? कशा वापरल्या? हे तालुक्यातील जनतेला माहिती आहे असेही कर्डिले व संचालक मंडळाने म्हटले आहे.
आ. प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद शुगर कारखान्याच्या गैर व्यवहाराबाबत ईडीने कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे तसेच याबाबत दोषारोपपत्र दाखल झालेले आहे अशी परिस्थिती असताना त्यांनी जिल्हा बँकेच्या कारभाराची चौकशीची मागणी करणे हास्यास्पद असल्याचे कर्डिले यांनी म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: