अहमदनगर जिल्हयातील नागरिकांना कळविणेत येते की, भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यात दिनांक 03/06/2024 ते 07/06/2024 या कालावधीमध्ये वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे तसेच दि. 04/06/2024 रोजी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
1) मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.
2) गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे.
3) मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्स् पासून दूर रहावे.
4) जाहिरात फलक (होर्डिंग्ज्) कोसळून होणा-या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज्) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी.
5) वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.
6) वादळी वारा व पाऊस यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.
7) शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
8) जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा.