विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यात महायुतीतून विवेक कोल्हे व राजेंद्र विखे असे दोघे इच्छुक आहेत. महायुतीचे वरिष्ठ नेते उमेदवारीबाबत निर्णय घेतील, अशी माहिती आ. राम शिंदे यांनी दिली. येत्या 31 मे रोजी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव होणार असून त्याची माहिती देण्यासाठी नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आ. शिंदे बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, अरुण मुंडे आदी उपस्थित होते. आ. शिंदे म्हणाले, विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे.
नाशिक विभागातील इतर जिल्ह्यांतील इच्छुकांबाबत मला माहिती नाही. परंतु नगर जिल्ह्यातून विवेक कोल्हे व राजेंद्र विखे इच्छुक आहेत. मात्र अद्याप उमेदवारीबाबत निर्णय झालेला नाही. या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे आ. शिंदे यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाविषयी माहिती देताना आ. शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त येत्या 31 मे रोजी चौंडी येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे, महादेव जानकर आदी उपस्थित राहणार आहेत.