नगर (प्रतिनिधी)- विधानसभेत दहा ते बारा जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मिळाव्या अशी मागणी राहणार आहे. महायुतीकडे आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. सत्तेत सहभाग दिला जात नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचे विस्तार करताना मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापि मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आलेले नाही. रिपब्लिकन हे अभिमानी असून, अपमान करणे योग्य नसल्याचा इशारा केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. तर श्रीरामपूरच्या जागेवर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.
संविधान सन्मान महामेळाव्यानिमित्त शहरात आलेले ना. आठवले यांची सोमवारी (दि.2 सप्टेंबर) शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव राजाभाऊ कापसे, प्रभारी दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, किरण दाभाडे, विवेक भिंगारदिवे, नगरसेवक राहुल कांबळे, योगेश त्रिभुवन, अविनाश भोसले, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, गौरव साळवे, बंटी गायकवाड, अजय आंग्रे, बाबा राजगुरु, सतीश मगर, बाळासाहेब शिंदे, विशाल घोडके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आठवले म्हणाले की, संविधान मजबूत करणे आवश्यक आहे. संविधान मजबूत झाल्याशिवाय माणूस मजबूत होणार नाही. आणि माणूस मजबूत झाल्याशिवाय देश मजबूत होणार नाही. देशाचे संविधान मजबूत करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. त्याचबरोबर सत्ताधारी व विरोधकांचीही जबाबदारी आहे. संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात आली आहे! असा अपप्रचार करुन विरोधकांनी वातावरण निर्मिती करून मतदान घेण्याचे काम केले. त्यामुळे लोकसभेत महाविकास आघाडीच्या जागा वाढल्या. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये, यासाठी आंबेडकरी समाजाला न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारने ठेवावी. महायुतीत नवीन जोडीदार आल्यानंतर आरपीआयकडे लक्ष दिले जात नाही. मात्र यापुढे आरपीआयला ग्राह्य धरून चालणार नाही. आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणुक मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी विचार करण्याची भूमिका त्यांनी मांडली.
शिर्डीची जागा मिळाली, असती तर तेथे निवडून आलो असतो. मंत्रीपदाचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी झाला असता, अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली. लोकशाही मजबूत होण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी खेळीमेळीच्या वातावरणात राजकारण केले पाहिजे. मात्र महाराष्ट्रात शिव्या शापचे राजकारण सुरू असून, राजकारण बदलत असल्याचे वक्तव्य आठवले यांनी केले. विधानसभेत आरपीआय महायुतीबरोबर ताकदीने उभी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर जातनिहाय जनगणनेला समर्थन दर्शवून जातनिहाय जनगणा होणे गरजेचे असल्याची भूमिका मांडून, त्यामुळे प्रत्येक जातीची टक्केवारी कळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांचा हिंदू राष्ट्र हा अजेंडा नसून, सबका विकास सबका साथ! या अजेंडा घेऊन ते जनतेपुढे जात असल्याचेही आठवले यांनी सांगितले.
शिर्डीची जागा मिळाली, असती तर तेथे निवडून आलो असतो… रामदास आठवलेंची खंत
- Advertisement -