अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा महापालिकेचा ठराव देखील घेण्यात आला आहे. अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आता शासनाकडे पाठवला जाणार आहे.
महानगरपालिकेने घेतलेल्या ठरावात म्हटले आहे की, “सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन प्राप्त प्रस्ताव आणि संदर्भीय शासन पत्रानुसार महानगरपालिकेच्या बहुमताच्या ठरावाची आवश्यकता आहे असे कळविलेले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, अहमदनगर महानगरपालिका यांनी प्रस्तावित केलेनुसार अहमदनगर शहराचे नांव “पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर” करणेच्या प्रस्तावास प्रशासक सर्वसाधारण सभा यास मंजूरी देत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून नामांतराचा ठराव पाठविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी तातडीने अधिकाऱ्यांची महासभा घेतली.
सध्या महानगरपालिकेत प्रशासक असून, अतिरिक्त्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त सचिन बांगर, शहर अभियंता मनोज पारखे, आस्थापना प्रमुख मेहेर लहारे यांच्या उपस्थित महासभा झाली.
महासभेत अहमदनगरचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ असे नामांतर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठवला जाणार आहे. त्यानंतर राज्य व केंद्र याबाबत निर्णय घेतील.