सावेडी उपनगरातील साई मिडास या व्यापारी संकुलाला आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी दाखल होऊन दुर्घटनास्थळाची पाहणी केली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागातील कर्मचारी झटत होते. त्याचबरोबर नगरसेवक अजित कोतकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तरीही या दुर्घटनांच्या मुळाशी पोहोचत उपाययोजना होणे गरजेचे आहे. कारण मागील काही दिवसात वारंवार अशा दुर्घटना शहरात घडल्या आहेत. खरं तर शहरातील प्रत्येक इमारतींचे वार्षिक फायर ऑडिट होणे गरजेचे आहे. पुणे-मुंबई सारख्या शहरात प्रत्येक इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असून त्यांचे वार्षिक ऑडिट होते. परंतु नगर शहरात मात्र महापालिका अधिकारी आर्थिक तडजोड करत वेळोवेळी आवश्यक असणाऱ्या ऑडिट कडे दुर्लक्ष करतात. ज्याचा परिणाम म्हणजे वारंवार शहरात आगीच्या दुर्घटना घडत आहेत. त्यामळे या दुर्घटनांसाठी हा अधिकारी वर्गच जबाबदार आहे.
त्याचबरोबर ठिकठिकाणी झालेल्या पत्र्याच्या गाळ्यांमुळेही धोखा निर्माण झाला आहे. एका गाळ्याला आग लागताच इतर गाळ्यांमध्ये आग सहज पसरते. या गोष्टींकडे लक्ष वेधले तरीही महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. विधानसभा अधिवेशनात या निष्क्रिय अधिकाऱ्यांना दुर्घटनसाठी जबाबदार धरून त्यांची बदल्या करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती आ.जगताप यांनी दिली.
आर्थिक तडजोडीतून मनपाचे इमारतींच्या फायर ऑडिटकडे दुर्लक्ष…आ. जगताप यांनी केली कारवाईची मागणी
- Advertisement -