सर्वसामान्य नागरीकांसाठी सुरु केलेल्या वाळू धोरणाच्या अंमलबजावणीत कोणी कितीही अडथळे आणले तरी, हे धोरण यशस्वी करण्यासाठी शासन समर्थ आहे. मात्र, ज्या कार्यक्षेत्रात आता वाळू विक्री केंद्र यशस्वीपणे सुरु करण्यास आधिकारी हलगर्जीपणा दाखवित असतील तर त्यांनाच जबाबदार धरुन कारवाई करण्याचा इशारा महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे वाळू विक्री केंद्राचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, शाळीग्राम होडगर, मच्छिंद्र थेटे, रोहीणी निघुते, कैलास तांबे, सतिष कानवडे, प्रांताधिकारी शैलेंश हिंगे, तहसिलदार धिरज मांढरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
ना. विखे पाटील म्हणाले, वाळूच्या पैशातून सुरु असलेले राजकारण आणि गुन्हगारीकरण थांबविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आत्तापर्यंत जेवढे वाळू विक्री केंद्र सुरु झाले आहे त्यामधून 20 हजार ब्रास वाळू उपलब्ध केली आहे. यामधून राज्य सरकारच्या तिजोरीत 600 रुपये दराने थेट रक्कम जमा झाली आहे. तरीही अद्याप या व्यवसायातील माफीयाराज संपत नाही. ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ असा उल्लेख करुन त्यांनी सांगितले की, सरकारी यंत्रणाच जर या वाळू धोरणात आता अडथळा आणत असेल तर गांभिर्याने पाऊल उचालावी लागतील, असे त्यांनी स्पष्ट केली.