संदीप कोतकर यांच्या एंट्रीने नगरमधील राजकीय समीकरणे बदलणार…गणेशोत्सवात दिसली झलक…
नगर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती व महाविकास आघाडीत घमासान लढाई होण्याची चिन्हे असून स्थानिक पातळीवर विधानसभा मतदारसंघातही राजकीय मोर्चेबांधणी सुरु झालेली आहे. या पार्श्वभूमीवर नगर शहरात गणेशोत्सवाच्या माध्यमातून माजी महापौर संदीप कोतकर यांनी राजकारणात पुन्हा एकदा दमदार एंट्री केली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत तब्बल दशकभरानंतर कोतकर यांच्या स्पंदन प्रतिष्ठानने सहभाग घेतला. तरूणाईचा मोठा प्रतिसाद त्यांच्या मिरवणुकीत पहायला मिळाला. कोतकर यांची एंट्री नगर शहरातील राजकीय समीकरणे बदलणारी ठरेल, अशी चर्चा सुरु झाली आहे.
नगर शहरातील राजकारणावर सुरुवातीपासून कोतकर परिवाराचे वर्चस्व राहिलेले आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे माजी महापौर संदीप कोतकर यांना नगर जिल्ह्यात येण्यास बंदी आहे. त्या केसचं काय होणार आणि न्यायालयाकडून त्यांना नगर शहरात येण्याची परवानगी मिळणार का? हा सुध्दा महत्वाचा प्रश्न आहे. मात्र त्यांचे समर्थक प्रचंड आशावादी असून स्वत: कोतकर यांनीच पुढाकार घेत यावर्षी गणेशोत्सवात स्पंदन प्रतिष्ठानला मिरवणुकीत उतरवले.
कोतकर शहराच्या राजकारणात परतल्यास मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. केडगाव उपनगर कोतकरांचा बालेकिल्ला आहे. त्यांच्या अवतीभोवतीच केडगावचे राजकारण फिरते. मध्यंतरी नेप्ती उपबाजार समितीला माजी सभापती भानुदास कोतकर यांचे नाव देण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त भानुदास कोतकर यांचे अतिशय भव्य स्वागत करण्यात आले. नगर शहर व तालुक्यातील कोतकर समर्थकांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती.