Tuesday, February 18, 2025

सावेडी नाट्यगृहाच्या बंद पडलेल्या कामाच्या ठिकाणी दारू, बियरच्या बाटल्यांचा खच, बनला तळीरामांचा अड्डा

प्रतिनिधी : निधी उपलब्ध असून, कोट्यावधी रुपये खर्च करून देखील सावेडी नाट्यगृह उभारणीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कधी सुरू होते तर ते लगेच बंद पडते. तब्बल एक दशकापासून हे काम रखडलेले आहे. याबाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने प्रत्यक्ष इन कॅमेरा पाहणी करत सोशल मीडियातून लाईव्ह पोलखोल केली असता अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विविध ब्रँडच्या दारू, बियर, सोडा वॉटरच्या बाटल्या, सिगरेटची पाकीटं, माव्याच्या पुड्या यांचा अक्षरशः खच त्या ठिकाणी आढळून आला आहे. हा तळीरामांचा अड्डा बनला आहे. काळे यांनी या धक्कादायक प्रकाराची लाईव्ह पोलखोल केल्यानंतर एकच खळबळ उडाली असून नगरकरांमध्ये तीव्र संतापाची भावना पाहायला मिळत आहे.

यावेळी बोलताना काळे म्हणाले की, नाट्य, संगीत, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत, नाट्य रसिक आणि तमाम नगरकरांसाठी ही संतापजनक बाब आहे. मनपा, राज्य आणि देशात यांची एक हाती सत्ता असताना साधं मनपाच्या स्वमालकीच नाट्यगृह हे उभारू शकत नसतील तर नगरकरच आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा सत्तेच्या शिखरावरून कडेलोट करतील, असा घाणाघात काळे यांनी केला आहे.

काळे पुढे म्हणाले, सन २०११ मध्ये पहिल्यां दोन कोटींचा निधी शासनाने दिला. त्यानंतर आमच्या महाविकास आघाडी सरकारने २०२० मध्ये पाच कोटी दिले. हे पैसे शासनाचे, जनतेचे आहेत. पण सत्ताधारी असा डींडोरा वाजत आहेत की जणू काही यांच्या स्वतःच्याच खिशातून ते खर्च करत आहेत. हा निधी मनपाकडे पडून आहे.
सावेडी नाट्यगृह ही शहराच्या वैभवात भर घालणारी वास्तू होती. सुंदर वास्तु उभी राहण्यापूर्वीच या वास्तूच्या दर्शनी भागासमोरच अति जलद अशा विक्रमी चारच महिन्याच्या काळात गाळे उभारले गेले. मात्र मनपाने दर्शनी भागच झाकून टाकत या वास्तूची वाट लावली. सत्ताधाऱ्यांचेच बगलबच्चे याचे लाभार्थी आहेत. चार महिन्यात गाळे उभे केले, मात्र दहा वर्षात यांना साधं नाट्यगृह का उभारता आलं नाही, असा संताप सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यामध्ये मनपाच्या मालकीचे बालगंधर्व, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशी स्वतःची नाट्यगृह आहेत. मात्र इतक्या वर्षांमध्ये मनपाचं स्वमालकीचं एकही नाट्यगृह या शहरात नसावा ही लाजिरवाणी गोष्ट आहे. नगर शहरामध्ये यामुळे व्यावसायिक नाटक आणण्याचं कोणताही ऑर्गनायझर धाडस करू शकत नाही. सहकार सभागृह आणि त्याचे संलग्न खर्च एवढे मोठे आहेत की प्रयोग तिकीट विक्री करून हाउसफुल झाला तरी देखील ऑर्गनायझरला परवडत नाही. माऊली सभागृहामुळे सावेडी उपनगरात थोड्या प्रमाणात का होईना पण दिलासाजनक स्थिती आहे. मात्र आसन क्षमता मर्यादित असल्यामुळे तिथे व्यावसायिक नाटकांचे अर्थकारण कोलमडते. त्यामुळे या शहरातील रसिकांची सांस्कृतिक भूक भागेल अशी कोणतीच व्यवस्था सत्ताधारी उभी करण्यामध्ये पूर्णत: अपयशी ठरले असल्याची खंत किरण काळे यांनी व्यक्त केली आहे.


नगर शहराच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेचा गौरव करताना काळे म्हणाले की, सुप्रसिद्ध हिंदी – मराठी सिने, नाट्य अभिनेते सदाशिव अमरापूरकर, शाहू मोडक, मधुकर तोरडमल, तर अगदी अलीकडच्या मिलिंद शिंदे, बोक्या सातबंडे या व्यावसायिक लोकप्रिय असणाऱ्या बाल रंगभूमीवरील नाटकातील चिमुकला आरूष बेडेकर अशी मोठी परंपरा आहे. गायिका अंजली, नंदिनी गायकवाड, पवन नाईक अशी सांगितिक क्षेत्रातील अनेक नावाजलेले कलावंत देखील शहरात आहेत. तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक, दिग्दर्शक या मातीत आहेत. राज्य नाट्य स्पर्धा नगरचे कलावंत दरवर्षी राज्याभर गाजवतात. मात्र मनपाची सांस्कृतिक क्षेत्राबद्दल असणारी अनास्था आणि त्याला न मिळणारा राजश्रय यामुळे शहराचे सांस्कृतिक वैभव धुळीला मिळण्याची दुर्दैवी वेळ आली आली असल्याची खंत किरण काळे यांनी यावेळी व्यक्त केले.
मोहिमेत मनोज गुंदेचा, संजय झिंजे, अनिस चूडीवाला, विलास उबाळे, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, माजी नगरसेवक फैयाज केबलवाला, युवक काँग्रेसचे शम्स खान, चंद्रकांत उजागरे, आर.आर.पाटील, राहुल सावंत, ॲड. अजित वाडेकर, मुस्तफा खान, महिला काँग्रेसच्या उषा भगत, शैला लांडे, डॉ. जाहिदा शेख, मीनाज सय्यद, शंकर आव्हाड, सुफियान रंगरेज, गौरव घोरपडे, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, गणेश आपरे, आनंद जवंजाळ, अशोक जावळे वाढदिवसाच्या काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles