येत्या तीन महिन्यांत महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंडमध्ये निवडणुका होत आहेत. त्याठिकाणी जनतेचा विश्वास संपादन करून सरकार आणावयाचे आहे, असे आवाहन करत निवडणूक प्रचारात मोदी सरकार, मोदी गॅरंटी म्हणणारे हे सरकार भारत सरकार असल्याचे मतदारांनी दाखवून दिले. पंतप्रधानपदाची मोदी यांनी शपथ घेतली असली तरी त्यांना या पदासाठी देशातील जनतेचा कौल होता का? हे पद घेण्यासाठी जनतेने त्यांना सहमती दाखवली का? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित करत मोदी यांचा समाचार घेतला.
नगरमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापनदिनासह लोकसभा निवडणुकीतील विजय साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पक्षाचे राज्यातील नूतन आठ खासदार, आमदार, माजी मंत्र्यांसह राज्याच्या कानाकोपर्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. यावेळी पवार म्हणाले, लोकसभा निवडणूक काळात मोदी जिथे जातील तेथे हे मोदी सरकार आहे, ही मोदींची गॅरंटी आहे, असे म्हणत होते, पण भारत सरकार म्हणत नव्हते, मात्र आज मोदी सरकार राहिले नाही व मोदी गॅरंटीही राहिली नाही. आजचे सरकार हे भारत सरकार आहे. पंतप्रधान हा एका पक्षाचा नसतो. देशातील सर्व जाती धर्म व भाषांचा असतो, परंतु हा सन्मान देण्यास मोदी विसरले असावेत किंवा त्यांनी मुद्दाम केले असावे. देशातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी यांना राज्यकर्त्यांनी विश्वास द्यायला हवा, पण मोदी त्यात कमी पडले.
येत्या तीन महिन्यात महाराष्ट्रासह हरियाणा व झारखंड राज्यात निवडणुका होणार आहेत. या राज्यातील जनतेचे संरक्षण करण्यासाठी नवीन पिढी घडवायची आहे व कष्ट करून येथे आपले सरकार आणायचे आहे आणि लोकांना विश्वास द्यायचा आहे, असे स्पष्ट करून पवार म्हणाले, देशाला प्रगतीकडे नेताना दलित वर्ग, अल्पसंख्याक, महिला व सामाजिक घटकांच्या हिताची जपवणूक करण्याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. त्यांना आत्मविश्वास देऊन त्यांची मनापासून सेवा करण्याचे वचन त्यांना देऊ, असे ते म्हणाले.