शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील ३० ते ४० गावांमध्ये ड्रोन सदृश्य वस्तू आकाशात फिरत असल्याचे नागरिकांनी गुरुवारी रात्री पाहिले. ड्रोन सदृश्य चमकणारी ही वस्तू आकाशात घिरट्या घालत असल्याने नागरिक भयभीत झाले. हा नेमका प्रकार काय आहे याची पोलीसही चौकशी करत आहेत. मात्र त्यांना याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समजली नाही. गत महिन्यामध्ये पारनेर तालुक्यातील निघोज परिसरामध्येही असेच ड्रोन फिरत होते. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र याबाबत पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही.
दरम्यान गुरुवारी रात्री पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील ३० ते ४० गावांमध्ये असे ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले. आकाशात फिरणारे तीन ते चार ड्रोन असून ते एका एखाद्या टॉवरच्या उंचीइतके आकाशात आहेत. ते आकाशात चमकत आहेत. ड्रोनसदृश्य वस्तू दिसल्यानंतर नागरिक घराबाहेर आले. टेरेसवर थांबले. त्यांनी एकमेकांना मोबाईल वरून संपर्क साधला असता त्यांच्या गावांमध्येही असेच ड्रोन ग्रामस्थांना आढळल्याचे समजले. अशाप्रकारे 30 ते 40 गावांमध्ये असे ड्रोन दिसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
ड्रोन सारखी चमकणारी वस्तू आहे. हे ड्रोन आहेत की आणखी काय काय आहे? याबाबत ग्रामस्थ किंवा पोलिस अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही. याबाबत प्रशासन पातळीवर संपर्क सुरू असून नेमका काय प्रकार आहे याची चौकशी केली जात आहे.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या पोलीस निरीक्षकांना दूरध्वनी करून रात्रभर गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनीही सतर्क रहावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.