शेवगावमध्ये एका साठ महिलेच्या घरात भरदिवसा घुसून गळ्याला चाकू लावत तिच्या गळ्यातील व कानातील दागिने लुटून नेल्याची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या घरात घुसून चोरीची घटना घडल्याने परिसरासह शहरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील शास्त्रीनगर भागातील धूत कॉलनी मध्ये सुजाता राजे भोसले या भाडोत्री राहतात. त्यांचा मुलगा पुणे येथे नोकरीला आहे. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास सुजाता या भांडी घासत असताना घरात घुसलेल्या अज्ञात भुरट्या चोरट्याने त्यांच्या गळ्याला चाकू लावून गळ्यातील व कानातील दागिने जबरदस्तीने घेतले.
या घटनेची परिसरातील रहिवाशांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. सहाय्यक फौजदार अरविंद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल राहुल आठरे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. यावेळी सदर महिला घाबरलेली असल्याने त्यांना पोलिसांना व्यवस्थित माहिती देता आली नाही. त्या म्हणाल्या की संशयित चोरट्याने काळी पॅन्ट घातली होती. तो रंगाने काळा सावळा होता.
दरम्यान शहराच्या विविध भागात गेल्या काही दिवसापासून भुरट्या चोराने धुमाकूळ घातला आहे. शहरातील मारवाडी गल्लीमध्ये राहणाऱ्या कुमार भोंडे, नंदकिशोर भोंडे यांच्या घरातून भुरट्याने दिवसा ढवळ्या मोबाईल लांबविल्याची घटना मागील आठवड्यात घडली. यावेळी भोंडे परिवारातील काहींनी या भुरट्या चोराचा पाठलाग केला, मात्र तो पसार झाला.
तसेच दोन दिवसापूर्वी शहरातील मारवाडी गल्ली तसेच बालाजी मंदिराच्या परिसरातील व्यापारी मोता यांच्या घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्याला परिसरातील रहिवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र त्यानंतर पुढे काय घडले याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. गेल्या काही दिवसापासून शहराच्या विविध भागात भुरट्या चोरांनी हैदोस घातल्याने जनतेमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे पोलीस यंत्रणेने या घटनांचा तपास घेऊन भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्रस्त नागरिकांतून होत आहे.