शेवगावचे ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. विजयराव उर्फ पोपटराव जगन्नाथ काकडे यांचे आज (दि.१८) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास शेवगाव येथील कृषी उत्पन बाजार समितीच्या समोर अपघाती निधन झाले आहे. मृत्युसमयी ते ७४ वर्षांचे होते. आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक देत, त्यांना चाकाखाली चिरडल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेमुळे शेवगाव शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे, की आज रविवारी शहरात एक खाजगी कार्यक्रम आटोपून अॅड. विजयराव काकडे हे घराकडे जात होते. शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यासमोर पाथर्डी रोडवरून ते दुचाकीवरून जात असताना आयशर ट्रकने त्यांना धडक दिली. जबर धक्का लागल्याने मागील चाकाखाली ते सापडल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती शेवगाव शहरासह तालुक्यात प्राप्त होताच घटनास्थळी व शेवगाव ग्रामीण रुग्णालयात बार असोसिएशन, नातेवाईक व समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. अॅड. काकडे हे शेवगाव येथील पुरोगामी डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ विधिज्ज्ञ होते. अत्यंत संयमी, मितभाषी असलेले अॅड. विजयराव काकडे यांचा तालुक्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठा सक्रिय सहभाग होता. बोधेगाव जिल्हा परिषद गटाचे काही वर्षे त्यांनी नेतृत्वदेखील केले होते. माजी मंत्री स्व. बबनराव ढाकणे यांचे जुन्या काळातील अत्यंत विश्वासू खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जात होते. तसेच बोधेगाव येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. १९९५ ला काँग्रेस पक्षाकडून पाथर्डी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती. परंतु उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पाथर्डी विधानसभा मतदासंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, तसेच चांगली मतेदेखील त्यांना मिळाली होती. या पराभवानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यांच्या आकस्मीक मृत्यूने शेवगाव शहरासह तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्च्यात पत्नी, मुले अॅड. युवराज व अॅड. अभिजित व एक विवाहित मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. जनशक्ती मंचचे अॅड. शिवाजीराव काकडे, अॅड. सुभाषराव काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनराव काकडे हे त्यांचे बंधू आहेत. तर माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांचे ते दीर होते. त्यांच्या पाठीमागे भाऊ, भावजयी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्याच्या अपघाती निधनाबद्दल सर्वस्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
शेवगावचे ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. विजयराव काकडे यांचे भीषण अपघातात निधन
- Advertisement -