शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे राष्ट्रवादीत दाखल
उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लहामगे यांनी केलेल्या प्रवेशाला पक्षांतर्गत गटबाजीची किनार असल्याने त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश शिवसेनेला धक्का मानला जात आहे.
राज्य सरकारने सुरु केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लहामगे राष्ट्रवादीत दाखल झाले. ना. पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत करुन सत्कार केला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, मा.आ. अरुणकाका जगताप, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे, प्रा. माणिक विधाते, विनीत पाऊलबुध्दे, साहेबान जहागीरदार, अमित खामकर, बाळासाहेब पवार, अभिजीत खोसे, पप्पू पाटील, नदीम शेख, अमित साळवे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंद लहामगे अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय जीवनात सक्रिय असून, ते कर सल्लागार आहेत. ओबीसी समाजात देखील त्यांचे कार्य सुरु आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख पदाची त्यांच्याकडे जबाबदारी होती. शहरासह जिल्ह्यात त्यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी कार्य केले आहे. राष्ट्रवादी पक्षात त्यांच्याकडे लवकरच महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुखाचा उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश
- Advertisement -