Saturday, March 2, 2024

नेता सुभाष चौकातील लोढा हाईटसमधील ताबेमारीचं काय? राष्ट्रवादीचा शिवसेनेलाही सवाल

नगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेताजी सुभाष चौकातील लोढा हाईट्सवर तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी अनेक वर्षांपासून ताबा मारलेला आहे. काही गाळ्यावर नगर अर्बन बँकेचे लोन आहे, जर तो शिवसेनेच्या नेत्याचा ताबा खाली केल्यास कित्येक गोर गरीब लोकांचे पैसे बँक देऊ शकेल त्यामूळे तुम्ही अशा ताबेमार शिवसेनेच्या नगर मधील नेत्यांचा पहिले ताबा खाली करा. त्याचबरोबर राजकारण काहीही असो, जे बहुचर्चित पत्रा चाळ ताबा मारी प्रकरणात जेलची हवा खाऊन आलेले आहेत. अशा राऊत अण्णांनी आधी आपल्या बुडाखालचा अंधार झाकावा असे खोचक प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिले आहे.
शिवसेना नेते खा.संजय राऊत हे नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नाव न घेता केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. यात त्यांनी म्हंटले आहे की,
नगरमध्ये जबरदस्तीने जागा बळकावल्याचे एक तरी प्रकरण साक्षी पुराव्यानिशी आमच्या समोर आणावे तुमच्या टांगेखालून जायला आम्हाला कमी पणा वाटणार नाही. परंतु तुमच्या रिकामटेकड्या बोल घेवड्या कार्यकर्त्यांनी खोटे नाटे सांगून तुमचे कान भरले आणि त्यांचे ऐकून तुम्ही कोणताही आगा पिछा खरे खोटे न बघता आमच्या नगर शहर विकासाच्या भाग्य विधाते युवा नेतृत्वावर टीका करीत असाल तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाही. निवडणुकच नाही तर खुल्या मैदानात तुम्हाला चारी मुंड्या चित करण्याची धमक नगरकरामध्ये आहे, हे लक्षात असू द्या. पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मेळावा घेण्याच्या नावाखाली सभागृहातल्या खुर्च्या भरवण्यासाठी हजेरी देऊन तुरुंगावरुन माणसे तुम्हाला का आणावे लागतात याचे जरा आत्मपरीक्षण करा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
यात त्यांनी पुढे म्हंटले आहे की, नगर शहर विकासाच्या प्रगतीपथावर आहे. आमदारकीच्या दोन टर्ममध्ये अनेक लोकोपयोगी कामे झाली. नगर दक्षिणचे खासदार आणि आमदार खांद्याला खांदा लावून विकास कामात मोठा निधी खर्च करतात. विकासातून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम सुरू आहे. नगरचे रस्ते मोठे पक्के सिमेंट काँक्रीटचे होत आहेत. अमृत योजना, स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम, उड्डाण पूल, लिंक रोड या माध्यमातून नगर शहराचे रंगरूप विलक्षण सुंदर होते आहे. या सर्व विकासकामात राष्ट्रवादीचे सर्व लोकप्रतिनिधी दिवस रात्र एक करून अविरत मग्न आहेत. तरी तुमच्या निष्क्रिय नेते आणि कार्यकर्त्यांचे ऐकून जर टीका करीत असाल तर ते सपशेल चुकीचे आहे.
ज्या खराब रस्त्यावरून तुम्ही गेलात त्या भागातील नगरसेवक तर तुमच्याच पक्षाचे आहेत ही वस्तूस्थिती आहे. ज्या वार्डात तुमची बैठक होती त्या बुरूडगाव रोड एस.टी. स्टॅन्ड रस्त्यावरील सिमेंटची चकाकी तुमच्या दुसऱ्याचा चष्मा घातलेल्या डोळ्यांना का दिसेनाशी झाली? या अगोदर महानगरपालिकेत तुम्ही जो सत्तेचा उपभोग घेत होता ती तर राष्ट्रवादीच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळाली होती. ही सत्ता मिळवण्यासाठी तुमच्या आधीच्या संपर्क प्रमुख, राज्य आणि राष्ट्रीय नेतृत्वाने किती वेळा आमच्या पक्ष कार्यालयाचे उंबरे झिजवले. हा इतिहास जनतेला माहित आहे आणि आता तुम्हीच केवळ विरोधाचे राजकारण म्हणून आम्हाला खेटण्याचा निष्फळ प्रयत्न करीत आहात.

ताबेमारी विषयी बोलत असताना तुम्ही किती मोठे गुंड आहात. शिवसेनेचा जन्मच ताबेमारीतून झाला हे तुम्ही भर सभेत मान्य करता या तुमच्या अशा थुकरट वक्तव्यातून तर तुम्ही आपल्या पक्षाची पूरती वाट लावली. तुम्हाला कंटाळून तुमच्या पक्षाचे नेते तुमच्या पक्षाला जय महाराष्ट्र करून गेले आणि आता तुम्ही नगरमध्ये इंटरेस्ट दाखवत आहात. पत्रा चाळ ची पुनरावृत्ती करण्यासाठी नगरमध्ये देखील तुम्ही म्हाडाची जमीन शोधून ठेवली आहे का की सन २०१९ सारखी आणखी धूळधाण तुम्हाला या निवडणुकीत देखील करून घ्यायची आहे.
नगर शहर हे शांत आहे , सर्व धर्म समभाव जपणारे आहे. शहराची शांती अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. ते बिघडवण्याचे काम तुम्ही करू नका. विकासाच्या नावाने कलंकित ५ टर्म नगर शहराने ज्या नरक यातना भोगल्या आहेत. त्यामुळे पुढच्या दोन टर्म नगरकरांनी तुम्हाला नाकारले ही वस्तुस्थिती आहे.
डाळ आणि साखर प्रभू रामचंद्राच्या पूजेसाठी वाटल्यावरून तुम्ही आमच्यावर टीका केली. पण नेता सुभाष चौकात पण ती वाटली गेली त्यावेळी तो तुमचा आदेश होता का की तुमच्या कार्यकर्त्यांचा मूर्खपणा होता असा सवाल त्यांनी विचारला आहे.
त्यामुळे आपले कुठे चुकते याचे आत्मपरीक्षण करण्या ऐवजी दुसऱ्याचे ऐकून तिसऱ्याचा मुका घेण्याचा प्रकार नगरकरांची करमणूक करणारा आहे. अशी गंमत पुढच्या काळात तुम्हाला आणखी महागात पडेल असा इशाराही त्यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये दिला आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles