शिवस्वराज्य यात्रेत माजी महापौर अभिषेक कळमकर यांचे घणाघाती भाषण
नगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी नगरमध्ये दाखल झाली. यानिमित्त पक्षाने नगर शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.डॉ.अमोल कोल्हे, खा.निलेश लंके, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी आ.दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
नंदनवन लॉन्स येथे झालेल्या जाहीर सभेत अभिषेक कळमकर यांनी स्वागतपर भाषण करताना जोरदार बॅटिंग केली. कळमकर म्हणाले, नगर लोकसभा मतदारसंघात खा.निलेश लंके यांनी मिळवलेला मोठा विजय हा सर्वसामान्यांचा विजय आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना माननारा मोठा वर्ग नगर शहरात आहे. पवार साहेबांनी नगरमध्ये संधी दिलेल्यांनी पक्षाशी गद्दारी केली. घरातच सर्व सत्तापदे असूनही त्यांनी शहराचा विकास करण्याऐवजी शहर भकास करण्याचे काम केले आहे. त्यांनी समोरासमोर येवून विकासकामांवर चर्चा करावी. शहरात दादागिरी, दहशत कोणाची आहे हे सर्वांना माहिती आहे. मी स्वत: त्यांच्यात काही काळ राहिलेलो आहे. त्यामुळे मला त्यांची सर्व कार्यपध्दती माहिती आहे. त्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी मी सज्ज आहे. मला नगर शहराला मोठे करायचे असून स्वत: मोठे होण्यासाठी मी प्रयत्न करीत नाही. शहरात सध्या मोठेमोठे होर्डिंग्ज लावून जाहीरातबाजी केली जात आहे. खरं तर मार्केटमध्ये जे प्रॉडक्ट खराब होत असते, चालत नसते त्याची जाहिरात जास्त करावी लागते. आम्हाला अशा जाहिरातींची गरज नाही. आमची विश्वासार्हता असल्याने आम्हाला ब्रॅण्डिंग करायची गरज नाही. माझ्या डोक्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हात आहे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची साथ आणि माझे बोट खा.निलेश लंके यांनी धरले आहे. त्यामुळे मी निश्चिंत आहे. नगर शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला विजयी करण्यासाठी आम्ही झटून काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली.