अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात एकलहरे- बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली होती. दरोडेखोरांनी एका युवकाची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली होती. संपूर्ण जिल्ह्याला हादरवुन सोडणाऱ्या या घटनेत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे गावात दरोडेखोरांनी नईम पठाण याची हत्या करून सात लाखांची रोकड घेवून पोबारा केल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण नगर जिल्हा हादरून गेला होता. परंतु या धक्कादायक दरोड्याप्रकरणात आता नवीन आणि खळबळजनक खुलासा झाला आहे.
दरोड्याचा बनाव करत पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. नईम पठाण याची पत्नी बुशरा पठाणनेच पतीला मारल्यानंतर दरोड्याचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात झोपेच्या गोळ्या खावू घातल्यानंतर साडीने गळा आवळून पत्नीनेच हे भयंकर कांड केल्याचा उलघडा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या धक्कादायक खुलाश्याने या संपूर्ण प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी नईमची पत्नी बुशरासहआणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींनीच मिळून दरोडेखोरांनी मारहाण करत घरातील ऐवज चोरून नेल्याचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत