नगर (प्रतिनिधी)- शहरात दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील रेशनधारक लाभार्थींना साखरेचे वाटपच होत नसून, आलेली साखर जाते कुठे? हा प्रश्न उपस्थित करुन साखरेचा दुकानदारांशी संगनमताने काळाबाजार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयुर बोचुघोळ यांनी केली आहे. भाजप युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने पुरवठा अधिकारी अर्चना भाकड यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले.
अनेक वर्षांपासून दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना शासनामार्फत अंत्योदय योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमध्ये साखर उपलब्ध केली जाते. परंतु नगर शहरांमध्ये जिल्ह्यातील साखरेचे वाटपच होत नाही. अधिकारी, दुकानदार यांच्या संगनमताने शहरात मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. ग्राहकांची फसवणूक करून सर्रास लुटमार सुरू असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थींना अन्न-धान्य वाटप केल्यानंतर बिल देणे आवश्यक आहे. परंतु आजपर्यंत कुठलाही दुकानदार ग्राहकांना बिल देत नाही. यामुळे कोणत्या व्यक्तीला किती धान्य मिळते? हे लपून राहते व धान्याचा काळाबाजार केला जातो. यामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. हा घोटाळा लपविण्यासाठी संबंधित कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. त्याचप्रमाणे बोगस रेशनकार्डचा सुळसुळाट सुरु असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या गंभीर प्रकारात तातडीने लक्ष घालून याप्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकारी व दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने बोचुघोळ यांनी केली आहे.
–
सर्वसामान्यांचे सहजासहजी रेशनकार्डचे कामे होत नाही. रेशनकार्डच्या कामासाठी एजंटना धरल्याशिवाय काम मार्गी लागत नसल्याने एजंटचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. या एजंटामुळे बोगस रेशनकार्ड देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर पुरेसे अन्न-धान्य देखील मिळत नसल्याने शहरात रेशनच्या अन्न-धान्याचा काळाबाजार वाढत आहे. पुरवठा विभागातील अनागोंदीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. -मयुर बोचुघोळ (शहर जिल्हाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा)
–