लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पहिल्यांदाच आपल्या पराभवावर मोठे भाष्य केले आहे.प्रसारमाध्यमांशी बोलताना सुजय विखे पाटील यांनी असे म्हटले आहे की, ‘विकास करत राहणे हे आपल्या परिवाराचे प्राथमिक धोरण राहिले आहे. दुर्दैवी बाब आहे की म्हणावा तसा प्रतिसाद विकासाला मिळाला नाही. एवढा विकास करून अपयश मिळालं. पण शेवटी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जनता बरोबर असते. असे काही उतार चढाव जीवनामध्ये येतात, त्याला सोबतीने घेऊन पुढे जावे लागते. एका पदापुरतं कुटुंब मर्यादित नाही. मी मुळातच राजकीय प्रक्रियेतील माणूस नव्हतो.
पण मी राजकारणात आलो, लोकांनी मला खासदार केले. मी पाच वर्षे प्रामाणिक काम केले. पण आज लोकांनी मला स्वीकारले नाही. पण आपण पडत-लढत राहू. पुढे याच्यापेक्षा काहीतरी चांगले साईबाबांच्या मनात असेल यामुळे हे झालं, असं म्हणून पुढे जायचे.’यापुढे बोलताना सुजय विखे यांनी, निवडणुका ह्या लागतच राहणार आहेत. हा काही पहिला पराजय नाही. नगरपालिका मध्ये अनेक आपले उमेदवार पराजित होतात. ग्रामपंचायत मध्ये अनेक ग्रामपंचायती आपल्या पराजित होतात. शेवटी तिथला कार्यकर्ता पराभूत होत असतो.पण, मी या मताचा माणूस आहे की कार्यकर्ता पराभूत झाला म्हणजे तो नेता पराभूत होत असतो. एखाद्या नगरपालिका मध्ये आमचा नगरसेवक पडला म्हणजे तो नेताचं पडला. त्यामुळे हा काय एवढा मोठा विषय नाही. त्यामुळे थेट आभाळ कोसळले आहे असेही नाही.
जसं पराभूत झालेल्या सरपंचाला आणि नगरसेवकाला सांत्वन करायला कोणी जात नाही. तसं माझंही सांत्वन कोणी करण्याचे कारण नाही. ते पडलेत पळायला लागलेत आणि मी पडलो तर पळायला लागलो संपला विषय, असं म्हणत आपल्या पराभवावर भाष्य केले आहे.एकंदरीत सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आता स्वीकारला आहे. तसेच पुढे काहीतरी चांगली संधी उपलब्ध होईल याच कारणाने बाबांनी हा पराभव घडवून आणला असावा असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.