नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील मिनी बँक सेंटरच्या काचेच्या दरवाजाचे लॉक तोडून आतील टेबलच्या ड्राव्हरमधून ६० हजार रुपये चोरणाऱ्या आरोपीचा नगर तालुका पोलिसांच्या पथकाने छडा लावला असून अखेर २ महिन्यानंतर त्याला पकडले आहे. त्याच्याकडून चोरीचे ६० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. विठ्ठल संजय घोडके (रा.घोसपुरी ता.नगर) असे या आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिनी बँक सेंटर चालक अजय गोरखनाथ शेंडगे (रा. मठ पिंपरी, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. रुईछत्तीसी येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये त्यांचा मिनी बँकींगचा व्यवसाय असून मिनी बँकच्या शेजारी ते वक्रांगी कंपनीचे एटीएम चालवितात. दि.१५ जून रोजी त्यांनी एटीएम मधे भरण्यासाठी ६० हजार रुपये मिनी बँकेच्या टेबलच्या ड्राव्हर मधे ठेवले होते. त्यानंतर दि.१६ रोजी सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी बँकेचा काचेचा दरवाजा बंद करुन साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी ते गेले. तेथून परत आल्यावर त्यांना मिनी बँकेच्या काचेच्या दरवाजाचे लॉक तुटलेले दिसले व पैसे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यांच्या या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तेव्हापासून पोलिस चोरट्याचा शोध घेत होते. गुरुवारी (दि.१५) स.पो.नि. प्रल्हाद गिते यांना सदरची चोरी ही विठ्ठल संजय घोडके (रा.घोसपुरी) याने केली असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाला आरोपीच्या शोधासाठी पाठविले. पथकाने घोसपुरी येथे त्याच्या राहत्या घरी घोडके याला पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची ६० हजारांची रोकड, तसेच काचेच्या दरवाजाचे लॉक तोडण्यासाठी वापरलेले स्क्रूडाव्हर हस्तगत करुन जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई स.पो.नि. प्रल्हाद गिते यांचे मार्गदर्शनाखाली स.फौ. रमेश गांगर्डे, भरत धुमाळ, पो.हे.कॉ.शाहिद शेख, नितीन शिंदे, पो.ना.धर्मनाथ दहिफळे, पो.कॉ.संभाजी बोराडे व दक्षिण मोबाईल सेलचे पो.कॉ. राहूल गुंडू यांचे पथकाने केली आहे.