शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या शेतकर्याला ५ जणांनी मारहाण केल्याची घटना शेंडी बायपास (ता. नगर) येथे घडली. मारहाणीत राजु रामदास गिते (वय ४०) हे जखमी झाले आहेत. त्यांनी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय रामदास गिते, रोहन संजय गिते, शेवाळे (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. शंभुराजेनगर, शेंडी बायपास) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना गुरूवारी (दि.१८) दुपारी बाराच्या सुमारास घडली. तर गुन्हा रविवारी (दि. २१) दाखल झाला आहे. गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास राजु गिते हे त्यांच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते.
तेथे त्यांचा भाऊ संजय तसेच रोहन व शेवाळे होते. त्यांनी फिर्यादीस,‘तु येथे काय करतो, नेहमीच किरकिर करतोस’ असे म्हणून संजय याने हातातील लोखंडी वस्तुने डोक्यात मारून जखमी केले. रोहन याने लाकडी दांडक्याने मारहाण केली व इतर दोन अनोळखी यांनी मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.