भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना देऊळगाव सिध्दी (ता. नगर) शिवारात घडली. रोहन अंबादास देविकर (वय 36 रा. देऊळगाव सिध्दी) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव सुर्यभान आळकुटे (रा. देऊळगाव सिध्दी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी (दि. २८) रात्री साडेआठच्या सुमारास देविकर व गावातील इतर लोक राजेंद्र हरिभाऊ गायकवाड यांच्या घरासमोर उभे असताना आळकुटेही तेथे आला. जय भारत मच्छिमार संस्थेमार्फत चालविण्यास घेतलेल्या तलावात मच्छिमारी करून न दिल्याच्या रागातून त्याने काशीनाथ सुलाखे यांना शिवीगाळ केली.
तेव्हा देविकर यांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला असता त्याने काही एक ऐकले नाही. तो देविकर यांना म्हणाल,‘भांडण सोडवण्यासाठी तुझे मध्ये यायचे काय कारण, आमचे आम्ही पाहुन घेवु’ तसेच शिवीगाळ करत चाकूने देविकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. देविकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून सोमवारी (दि. २९) दुपारी महादेव आळकुटे विरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहा.पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. महादेव आळकुटे याला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग अधिक तपास करीत आहेत.