Monday, April 28, 2025

इतरांना जे जमले नाही ते काम पाचपुते, कर्डिलेंच्या माध्यमातून पूर्ण होणार….

बाकीच्या लोकांना साकळाई योजनेचे काम जमले नाही ते काम आमदार पाचपुते आणि कर्डिले यांच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याचे मत खासदार सुजय विखे पाटील यांनी मांडले. ते देऊळगाव सिद्धी येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाचे काम कागदावर आणून चालू केले असून सदरील काम हे आमदार बबनराव पाचपुते आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून मार्गी लागत असल्याचे मत यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

गेली पन्नास वर्षांपासून साकळाई योजनेवर राजकारण सुरू आहे. मागील दीड वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी,महायुतीचे सरकार आल्यावर साकळाई योजनेच्या कामाला मंजुरी आणून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या साकळाई योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ७९४ कोटी रुपयांची योजना पूर्ण करून दाखवणार असल्याचे विधान यावेळी सुजय विखे पाटील यांनी केले.

साकळाई योजनेचे तीन टप्पे होणार असून पहिल्या टप्प्यात ४०० कोटी रुपयाचे काम केले जाईल आणि उर्वरित काम हे पुढील टप्प्यांमध्ये केले जाईल आणि विशेष म्हणजे हे काम काही दिवसातच पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष दीपक कारले, भाऊसाहेब बोटे, रबाजी सुळ, मधुकर मगर, संजय गिरवले, संतोष मस्के, अभिलाष घिगे, प्रशांत गहिले, प्रभाकर बोरकर, दादासाहेब दरेकर, नानासाहेब बोरकर, नवनाथ गिरवले, दादासाहेब बोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विविध विकासकामे आपल्या जिल्ह्यात पूर्णत्वास आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील विकास कामांमध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही, त्यामुळे हा विकास कामांचा ओघ सुरूच आहे असे देखील सुजय विखेंनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात जी अनेकविध विकासकामे केली जात आहेत, ती सर्व विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम एका खासदाराचे असते आणि ते काम मी अगदी चोखपणे बजावत आहे. त्यामुळे विरोधकांना कुठेतरी या गोष्टी सहन न होण्यासारख्या आहेत. कारण एका विकास कामावर वर्षानुवर्षे मतदान मागणे ही कला त्यांना अवगत आहे. त्यांच्या या काव्याला पूर्णपणे आळा घालण्याचे काम माझ्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे साहजिक आहे विरोधकांकडून विरोध होणारच, परंतु आपली विकासकामे थांबणार नाहीत असे आश्वासन देखील खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थितांना दिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles