नगर – महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) च्या धोरणानुसारच जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, आघाडीच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असल्याचा खुलासा टीडीएफचे माजी अध्यक्ष अशोक नवल व माजी कार्यवाह शिवाजीराव ढाळे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) च्या पदाधिकाऱ्यांची निवड कौन्सिल सदस्यांची सर्वसाधारण सभा आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते व कार्यवाह हिरालाल पगडाल यांच्या आदेशाने 19 सप्टेंबर 2023 रोजी झाली होती. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या 2018 च्या निवडणुकीतील बंडखोरी व फाटाफुटीमुळे टीडीएफचे अधिकृत उमेदवार संदीप बेडसे यांचा प्रचार ज्यांनी केला त्या निष्ठावान शिक्षक कार्यकर्त्या मधूनच नवीन जिल्हा पदाधिकारी निवडावेत, असे धोरण महाराष्ट्र टीडीएफने घेतले होते. त्यांच्या आदेशानेच मधुकर पवार यांची जिल्हाध्यक्ष आणि भीमराज खोसे यांची कार्यवाहपदी निवड करुन इतरांची पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे. मध्यवर्ती टीडीएफच्या लेखी मान्यतेनेच नवीन कार्यकारिणी जाहीर केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघाच्या 2018 च्या निवडणुकीत महाराष्ट्र टीडीएफने बेडसे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. त्या दरम्यान नगर जिल्हा टीडीएफ कार्यकारणीची बैठक झाली. त्या बैठकीत बहुमताने बेडसे यांचा प्रचार करण्याचा ठराव संमत करण्यात आला. त्या बैठकीला तत्कालीन खजिनदार बाजीराव कोरडे उपस्थित होते. परंतु त्यानंतर प्रचारात त्यांनी व त्यांच्या मित्र मंडळांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून त्यांना त्यांच्या वेगळ्या भूमिकेपासून परावृत्त करण्यासाठी टीडीएफचे माजी आमदार कै. जयवंतराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष अशोक नवल, टीडीएफचे संस्थापक सदस्य पैकी असलेले बी.पी. बोलगे, आबासाहेब कोकाटे हे कोरडे यांच्या श्रीगोंदा येथील निवासस्थानी गेले होते. त्यांची समजूत काढण्याचा अटोकाट प्रयत्न केला, परंतु कोरडे व त्यांच्या मित्रमंडळाने टीडीएफ उमेदवाराच्या विरोधात भूमिका कायम ठेवून बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला. तसेच गेल्या सहा वर्षात टीडीएफ कार्यकारणिच्या कोणत्याही सभेला ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे कोरडे यांना टीडीएफ निवडीबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नसल्याचे म्हंटले आहे.
ज्यांना जिल्हा टीडीएफ निवडीबद्दल आक्षेप आहेत, त्यांनी महाराष्ट्र टीडीएफकडे तक्रार करावी. महाराष्ट्र टीडीएफ जो आदेश जिल्हा टीडीएफला देईल त्या आदेशाचे पालन निश्चितपणे केले जाईल.
पुढील 2024 च्या नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाराष्ट्र टीडीएफने नगर जिल्ह्याला अधिकृत उमेदवारी द्यावी आणि तो उमेदवार निवडून यावा या विचाराने जिल्हा टीडीएफ काम करणार आहे. ज्यांना टीडीएफच्या पंचसूत्री व धोरणावर विश्वास आहे, अशांना निश्चितपणे संधी मिळणार असल्याचा विश्वास नूतन अध्यक्ष मधुकर पवार यांनी व्यक्त केला आहे.
शिक्षक मतदारसंघात बंडखोरीला मदत करणाऱ्यांना नगर जिल्हा टिडीएफ कार्यकारिणीत स्थान नाही
- Advertisement -