TDF मध्ये कुठलीही फूट नाही. मान. हिरालाल पगडाल
(महासचिव महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी)
TDF ही कै. तात्यासाहेब सुळे यांनी शिक्षण आणि शिक्षक हितासाठी स्थापन केलेली पुरोगामी विचारांची शिक्षक आघाडी आहे. त्यांच्या विचाराचा वारसा घेऊनच आमची पुढची वाटचाल चालू आहे. विधान परिषद शिक्षक मतदार संघात TDF च्या उमेदवाराला बाहेरून राजकीय पक्षांचा पाठींबा मिळत असे पण आज TDF चे नेतेच राजकीय पक्षात प्रवेश करून त्यालाच TDF मध्ये विभाजन म्हणत आहेत.
महाराष्ट्र TDF कडून उमेदवारी मिळावी म्हणून विद्यमान आमदार किशोर दराडे व नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे विश्वस्त अॅड. संदीप गुळवे तसेच अहमदनगर येथील १२००० शिक्षक सभासद असलेल्या जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे गेल्या २६ वर्षापासून सर्वेसर्वा असलेले भाऊसाहेब कचरे यांना मुलाखती दिलेल्या होत्या. आमदार किशोर दराडे अॅड. संदीप गुळवे हे संस्थाचालक आहेत. तर प्रा. भाऊसाहेब कचरे हे दीर्घकाळ शिक्षक चळवळीशी संबंधित असून शिक्षक कार्यकर्ते आहेत. त्यांचा या मतदारसंघातील शिक्षकांशी शिक्षक कार्यकर्ता म्हणून परिचय आहे. ते शिक्षक असल्याने शिक्षकांच्या प्रश्नांशी, अडचणींशी त्यांचं प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले उमेदवार हे शिक्षकच नसल्याने ते विधान परिषदेत शिक्षकांच्या व शिक्षणाच्या संबंधिच्या प्रश्नांमध्ये अजिबात प्रभावीपणे काम करू शकले नाहीत. त्यामुळे या मतदारसंघातील शिक्षकांचा भ्रमनिरास झालेला आहे. शिक्षकांच्या व शिक्षणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. “आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या” म्हणून शिक्षकांना आंदोलन करावे लागत आहे.
सेवाशाश्वती, सेवानिश्चिती, पेन्शन व शिक्षकांचे पगार बँकेत शिक्षकांच्या खाती जमा करणे यासारख्या प्रश्नांवर TDF च्या प्रतिनिधींनो सरकारला धारेवर धरून विधान परिषदेत तर कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर येऊन दीर्घकाळ आंदोलन केले. यामध्ये TDF चळवळीतील रेडकर सरांसारख्या कार्यकर्त्याला मरण पत्करावे लागले. हा TDF चा इतिहास असून प्रत्येक उमेदवाराला राजकीय पक्षाची अधिकृत उमेदवारी घेऊनही TDF शी संबंध असल्याचे दाखवावे लागते. आज TDF ने शिक्षकांसाठी मिळविलेली पेन्शन गेली, राष्ट्रीयकृत बँकेत पगार करण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे, खाजगी शाळांमधील विनाअनुदानित शिक्षकांना सेवाशाश्वती, सेवानिश्चिती नाही, टप्पाअनुदान नाही, आश्रमशाळेच्या मनमानेल त्या वेळा, खाजगी विद्यापीठे, तंत्रशिक्षण, कृषीशिक्षण यामध्ये संघटनांचा धाक अधिकाऱ्यावर राहिलेला नाही हे केवळ शिक्षकांचा आमदार शिक्षक नसल्याने होत असल्याचे शिक्षकांच्या लक्षात येत आहे. हे सर्व TDF च परत मिळवून देऊ शकते हा विश्वास शिक्षकांना आहे. तसेच या मतदार संघातील शिक्षकांमध्ये TDF विचारधारेची पाळेमुळे घट्ट रुतलेली असल्याने हा मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून झालेल्या मागील अपवाद वगळता झालेल्या सहा निवडणुकांपैकी ५ निवडणुकांमध्ये TDF चेच उमेदवार विजयी झालेले आहेत. शिक्षक नसलेले राजकीय पक्षाचे उमेदवार आमदार किशोर दराडे, अॅड. संदीप गुळवे तसेच भाजपाशी संबंधित असलेले व अपक्ष उमेदवारी करत असलेले अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे आपल्या संबंधित शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांवरती दबाव आणून आपल्याबरोबर असल्याचे भासवून TDF मध्ये फूट असल्याचे दाखवित आहेत व शिक्षक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.
ही निवडणूक “शिक्षक उमेदवार” विरुद्ध “शिक्षक नसलेले संस्थाचालक उमेदवार” अशी होत असून कुठल्याही परिस्थितीत आमदारकी मिळवायचीच या एकाच उद्देशाने पछाडलेले हे शिक्षक नसलेले उमेदवार या शिक्षकांच्या मतदार संघात नामसाधर्म्य उमेदवारांचे अर्ज दाखल करणे, त्यातून आयुक्त कार्यालयातच गुंडागर्दी, उमेदवारी मागे घेण्यासाठी गृहमंत्रालयाचा हस्तक्षेप, सामिष पायऱ्यांचे आयोजन, शिक्षक मतदारांचे घरे शोधून त्यांना भेटवस्तू देऊन आमिषे दाखविणे यासारख्या गैरप्रकारांनी अक्षरशः धुडगूस घातलेला आहे. शिक्षकांचा मतदार संघात सर्रास साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर होताना दिसत आहे. संस्थाचालकांमार्फत शिक्षक कार्यकर्त्यावर बंधने घातली जात आहेत. या सर्व प्रकारांमुळे शिक्षकांच्या हितासाठी असलेला हा शिक्षकांचा मतदार शिक्षकांनाच नकोसा झाला आहे.