तहसीलदार व नायब तहसीलदारांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने 28 डिसेंबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाचे लक्ष या मागणीकडे वेधण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणे आंदोलन केले.
तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेचे पदाधिकारी विशाल नाईकवाडे, किशोर कदम, प्रदीप पाटील, शिल्पा पाटील, मिलिंद कुलथे, नायब तहसीलदार पूनम दंडिले, संध्या दळवी, गणेश आढारी, शंकर रोडे, सचिन औटी, एम. एस. करांडे, प्रफुल्लिता सातपुते, हेमंत पाटील, नवनाथ लांडगे, मयूर बेरड, अभिजित वांढेकर, सुधीर उबाळे, श्रीकांत लोणारे, संदीप भांगरे, एस. एम. मगर, श्रीकांत लोनो, किशार कदम, दत्तात्रय भवारी, मिलींद कुलथे, विशाल नाईकवाडी, सुधीर उबाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल दोन तास धरणे आंदोलन केले.
या निवेदनात म्हटले आहे, के.पी. बक्षी समितीने वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी नायब तहसीलदारांना ग्रेड पे 4800 देण्याची शिफारस केली होती. बक्षी समितीच्या शिफारशींचा अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने 3 एप्रिल 2023 रोजी काम बंद आंदोलन केले होते. त्यावेळेस महसूल मंत्र्यांनी वित्तमंत्र्यांशी चर्चा केली. वित्त मंत्र्यांनी आश्वासन दिल्याने 6 एप्रिल रोजी आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर वेतनातील त्रुटी दूर झाल्या नाहीत. त्यामुळे संघटनेने पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
जिल्हाधिकार्यांना 29 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले, 5 डिसेंबर रोजी एक दिवसाची सामूहिक रजा टाकण्यात आली, 18 रोजी दोन तास धरणे आंदोलन आणि स्मरणपत्र देण्यात आले. संघटनेच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास 28 डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.