डीटीएड धारकांसाठी खुश खबर ! ‘या’ महिन्यात टीईटी परीक्षा…. परीक्षेचे वेळापत्रक

0
40

अहमदनगर-पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 संदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. या परिपत्रकामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे. या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. दोन पेपर असल्याने सकाळच्या सत्रात एक आणि दुपारच्या सत्रात एक असे परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे.

महाराष्ट्र राज्यात इ. 1 ली ते 5वी व इ.6 वी ते इ.8वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ या बातमीत देण्यात आला आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आहे.

परीक्षेचे वेळापत्रक –
या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 9 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 असणार आहे. परीक्षेचे प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी दिनांक 28 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 एवढा कालावधी मिळणार आहे. 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी साडेदहा ते एक दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक होणार आहे त्यानंतर दुपारच्या सत्रात दोन ते साडेचार दरम्यान पेपर क्रमांक दोन होणार आहे. परीक्षेचे अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार आहेत. अर्ज भरणे, शुल्क याबाबतची माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेला तात्पुरता प्रवेश देऊन निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणावेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास किंवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाइन अर्जातील माहिती आणि मूळ कागदपत्रांत तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल, असे राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.