नगरमध्ये तिरूपती बालाजी कल्याणोत्सवाची उत्सुकता शिगेला
शिल्पा गार्डन येथे दर्शन व प्रसादाची विशेष व्यवस्था
नगर : सुख समृध्दीची मनोकामना पूर्ण करणाऱ्या तिरूपती बालाजींवर भाविकांची विशेष श्रध्दा आहे. तिरूमला तिरूपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ हेमराज बोरा यांच्या पुढाकारातून तिरूपती बालाजी उत्सव मूर्तीचा श्रीनिवास कल्याणोत्सव (विवाहोत्सव) दि.27 फेब्रुवारी रोजी नगरमध्ये प्रथमच होणार आहे. साक्षात बालाजीचे दर्शन नगरमध्येच मिळणार असल्याचे बालाजी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नगरसह जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे शिल्पा गार्डन येथे सर्व भाविकांसाठी दर्शनाची तसेच प्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महिला, लहान मुले, वयोवृध्दांना व्यवस्थित दर्शन घेता येईल यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि.27 फेब्रुवारी रोजी माणिकनगर शिल्पा गार्डन येथे श्रीनिवास कल्याणोत्सव (विवाहोत्सव) सायंकाळी 6 ते 9 यावेळेत होणार आहे. तत्पूर्वी उत्सव मूर्तीची सायंकाळी 4 ते 5.30 यावेळेत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. श्रीनिवास कल्याणोत्सवाला बालाजीच्या आराधनेत मोठं महत्व आहे. तिरूपती बालाजी येथे होणाऱ्या सोहळ्याच्या धर्तीवर नगरमध्येही हा सोहळा भव्यदिव्य स्वरुपात होणार आहे. यासाठी देवस्थानचे पुजारी नगरला येणार आहेत. त्यांचीही सर्व व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आलेली आहे. बालाजी भगवानांचे प्रत्यक्ष दर्शन व प्रसादाचा लाभ भाविकांना मिळेल.
तिरूपतीला जाऊन बालाजी दर्शनाची इच्छा असलेल्यांसाठी हा सोहळा पर्वणी ठरणार आहे. साक्षात बालाजीच भाविकांना दर्शन देण्यासाठी नगरला येत आहेत. त्यामुळे नगरमध्ये बालाजीमय वातावरण तयार झाले आहे. सोहळ्यानिमित्त निघणारी शोभायात्रा ऐतिहासिक ठरणार आहे. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या शोभायात्रेतही भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.