नगर दि. ३ प्रतिनिधी
जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दिला असून, हे नाव देण्यास विभागाची कोणतीही हरकत नसल्याचे पत्र दिल्याने जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्याचे महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची मागणी झाल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने अहिल्यानगर असे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. नामांतराच्या बाबतीतील सर्व प्रक्रीया ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत पुर्ण होत असल्याने प्रत्येक विभागाची ना हरकत आवश्यक असते.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नामांतराच्या बाबतीत हरकत नसल्याचे पत्र जारी करुन, अहिल्यानगर नावास मान्यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्वेस्थानक देशात नसल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात नमुद केल्याने जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यातील पहिला टप्पा पुर्ण होत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.