नगर अर्बन बँकेशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासावर कोणीतरी प्रभाव टाकत आहे, असे गंभीर निरीक्षण छत्रपती संभाजीनगर खंडपिठाने नोंदविले आहे. यामुळे पोलीस प्रशासन संशयाच्या भोवर्यात सापडले आहे. दरम्यान, बँक व पोलीस तपासातील गोपनीय कागदपत्रे समाज माध्यमांवर सार्वजनिक केल्याबद्दल साईदीप अग्रवाल व नगर अर्बन बँकेच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या अॅडमिनची चौकशी करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.
नगर अर्बन बँकेच्या 291 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी अविनाश वैकर याच्या जामीन अर्ज सुनावणीत न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवले. संशयित आरोपीचा मुलगा पोलीस तपासाचे गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक करतो हे देखील खुपच गंभीर आहे. तसेच अटकेत असलेल्या संशयित आरोपी वैकर पर्यंत ही गोपनीय कागदपत्रे कशी पोहचली हा देखील गंभीर मुद्दा आहे, असे स्पष्ट भाष्य न्यायालयाने केल्यामुळे या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस आता चौकशीच्या रडारवर आले आहेत. न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांच्यासमोर सुनावणी झाली.
फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टच्या परिशिष्टाच्या भाग प्रती व्हॉट्सअॅपवर आल्या आहेत. हा अहवाल कसा लीक झाला आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर आणि वैयक्तिकरित्या साईदीप अग्रवाल यांनी कसा प्रसारित केला गेला याचा त्वरित तपास करण्याचे निर्देश न्यायालयाने तपासी अधिकार्यांना दिले आहेत. तपास अधिकार्यांनी सदर ग्रुपचे अॅडमिन आणि साईदीप अग्रवाल यांच्यावर कडक कारवाई करावी. त्यांनी न्यायालयात, तपास निकालाचा अहवाल द्यावा. आरोपींपैकी कोणी त्यांच्यावर तपासात प्रभाव टाकत आहे का, हे त्यांनी न्यायालयासमोर मांडावे. जर त्याला हा परिशिष्ट फॉरेन्सिक ऑडिट अहवाल तपासाचा भाग बनवायचा असेल तर त्याने तो ट्रायल कोर्टातील चार्जशीटमध्ये जोडून सरकारी वकील तसेच आरोपींना पुरवावा, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 सप्टेंबरला होणार आहे.