नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतलेला अधिकारी राजेंद्र केशव डोळे (रा. सातारा) याला रात्री उशिरा चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कुवत नसताना कर्जाची शिफारस करणे, कर्जाची कागदपत्रे स्वतःच तयार करणे, यासह डोळे याच्या खात्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा झाल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालानुसार पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरू आहे. काही संचालक व अधिकारी, कर्जदारांना अटकही करण्यात आली आहे. तसेच, इतर काही अधिकार्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यात डोळे यांच्यावर संशय आल्याने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले होती. डोळे हे बँकेच्या मुख्यालयात कर्ज छाननी समितीत अधिकारी होते. चौकशीनंतर रात्री त्याला अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी दुपारी तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अमोल भारती यांनी न्यायालयासमोर हजर केले. सरकार पक्षाच्या वतीने ड. मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली.