Saturday, February 15, 2025

तरुण शेतकऱ्याला पेट्रोल टाकून पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न, अहमदनगरमधील घटना

अहमदनगर-नकाशात दर्शविलेल्या रस्त्याऐवजी दुसऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत रस्त्याचे काम सुरु केल्याने त्यास विरोध करणाऱ्या तरुण शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यास पेटवून दिल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा गावच्या शिवारात घडली आहे. या घटनेत दादाभाऊ गोरख वाबळे (वय ३२, रा. पिंपळगाव वाघा ता.नगर) हा शेतकरी सुमारे ८० टक्के भाजला असून नगरमधील एका खाजगी रुग्णालयात त्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

पिंपळगाव वाघा गावच्या शिवारात गट नं १५५ मधील शेतातील रस्त्याचा वाद गेल्या २ वर्षांपासून सुरु आहे. परिसरातील शेतकरी व ग्रामपंचायत यांच्या कडून नकाशात असणाऱ्या रस्त्याऐवजी दुसऱ्याच ठिकाणी रस्ता करण्याचा प्रयत्न करत होते. त्यास शेतकरी वाबळे यांचा विरोध होता. बुधवारी (दि.६) दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास परिसरातील शेतकरी, ग्रामपंचायत चे पदाधिकारी व काही ग्रामस्थ त्या ठिकाणी गेले व त्यांनी रस्त्याचे काम सुरु केले. त्यावेळीही दादाभाऊ वाबळे यांनी त्यास विरोध करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथे वाद झाला. हा वाद सुरु असताना दादाभाऊ वाबळे यांच्या अंगावर कोणीतरी पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. त्यामुळे आगीचा भडका होऊन त्यात ते गंभीर रित्या भाजले गेले. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. ते सुमारे ८० टक्के भाजले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ही माहिती पोलिसांना मिळाल्यावर नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देत या घटनेच्या अनुषंगाने सखोल चौकशी सुरु केली. अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले यांनीही घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. गुरुवारी (दि.७) सायंकाळी रुग्णालयात उपचार घेत असलेले दादाभाऊ वाबळे यांचा जबाब पोलिसांनी घेतला असून त्यांच्या जबाबानुसार आरोपी सोमिनाथ बाजीराव वाबळे (रा. पिंपळगाव वाघा ता.नगर) याच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३०७ प्रमाणे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी असलेले दादाभाऊ वाबळे हे सुमारे ८० टक्के भाजलेले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या ही परिस्थितीत त्यांनी दिलेल्या जबाबावरून एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक व तेथे प्रत्यक्षदर्शी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांचे जबाब घेण्याचे काम सुरु असून ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सदस्य यांच्याकडेही चौकशी करण्यात येत आहे. या घटनेचा सखोल तपास करण्यात येत असून यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles