विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, अन्यथा कारवाई महिनाभरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवा अन्यथा शाळेची मान्यता रद्द
अहमदनगर -विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधे येत्या महिनाभरात सीसीटिव्ही कॅमेरे न बसविल्यास त्या संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल असा इशारा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर यांनी विद्यार्थी सुरक्षेसाठी आयोजित बैठकीत दिला. विद्यार्थी सुरक्षेसाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखकांची कार्यशाळा आज दि. २७/०८/२०२४ रोजी दुपारी २.३० वाजता ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मा. श्री आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर, श्री भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), श्री अशोक कडूस शिक्षणाधिकारी (माध्यमिक), उपशिक्षणाधिकारी श्रीम. राजश्री घोडके व श्रीम. मीना शिवगुंडे आदी उपस्थित होते.
शाळेत सीसीटिव्ही कॅमेरे बसविल्यानंतर मुख्याध्यापकांनी ठराविक वेळेनंतर फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे. तपासणीदरम्यान फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी दिसून आल्यास संबंधितावर कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची किंवा शाळा व्यवस्थापन समितीची असेल. त्यामुळे मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान तीन वेळा फुटेजची तपासणी करणे गरजेचे आहे. या फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्वरीत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याचीही जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे. त्यामुळे शाळेत काही अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक जबाबदार राहिल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री भास्कर पाटील यांनी केले. अहमदनगर