जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान
टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये 42 कि.मी.अंतर 5 तासांत पूर्ण करण्याची कामगिरी
नगर : मुंबईत झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये 42 कि.मी.चे अंतर पाच तासांत पूर्ण करण्याची कामगिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केली आहे. प्रजासत्ताक दिनी पोलिस मुख्यालयात झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते येरेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे आदी उपस्थित होते.
कर्तव्य बजावतानाच नियमित व्यायाम, चालणे ठेवून इतरांनाही त्यासाठी प्रेरणा देण्याचे काम केल्याबद्दल पालकमंत्री विखे यांनी येरेकर यांचे विशेष कौतुक करीत अभिनंदन केले. आशिष येरेकर यांनी अतिशय व्यस्त दिनक्रम असतानाही अनेक वर्षांपासून नियमित व्यायामावर भर दिलेला आहे. मुंबई मॅरेथॉनची तयारी त्यांनी एक वर्षापासून चालवली होती. अहमदनगर रनर्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी रोज सकाळी 6 वाजता धावण्याचा सराव सुरु केला. कॅन्टामेंट, भुईकोट किल्ला परिसरात त्यांनी सराव केला. मुंबई मॅरेथॉनमध्ये जगभरातील 59 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. नगरमधून 100 हून अधिक स्पर्धक गेले होते. अधिकारी म्हणून अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना ताणतणावांना सामोरे जावे लागते. अशा वेळी सकारात्मक राहून प्रश्नांची सोडवणूक करणे महत्वाचे असते. यासाठी नियमित व्यायाम, चालणे असल्यास शरीराची कार्यक्षमताही वाढते आणि मनालाही ऊर्जा मिळते, असाच संदेश ते सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना देऊन शारीरिक स्वास्थ्यासाठी प्रेरित करीत असतात.